बीड जिल्हा वार्षिक योजनेतून 394 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर

बीड येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते 
Image

बीड, दि. २६ जानेवारी:-  भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त बीड येथील पोलीस मुख्यालय मैदानावर झालेल्या  मुख्य शासकीय समारंभात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण  झाले.

पालकमंत्री श्री मुंडे यांनी याप्रसंगी जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या. यावेळी भारतीय प्रजासत्ताक   निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या वीर शहिदांना अभिवादन करत राज्यघटना लिहिणाऱ्या संविधान कर्त्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचेही यावेळी संस्मरण केले.

यावेळी कोरोना आजारावर  संशोधकांनी लस शोधण्यात यश मिळवण्याचा उल्लेख करून सीरम इन्स्टिट्यूटमध्ये  लसीची निर्मिती केली जात आहे  महाराष्ट्र सरकारने यासाठी  दिलेला पाठींबा महत्वपूर्ण  आहे.  अमेरिका, रशिया  या देशांच्या बरोबरीने भारताची कामगिरी झाली असून त्याचा आनंद  व्यक्त केला या पार्श्वभूमीवर  आजचा समारंभ अत्यंत उत्साहाने पार पडला.

आज सकाळी ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली.समारंभास आमदार संदीप क्षीरसागर, आमदार संजय दौंड, जिल्हाधिकारी रविंद्र जगताप,  जिल्हा पोलिस अधीक्षक आर. राजा,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्यासह प्रमुख मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी आदी निमंत्रित उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. मुंडे उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना म्हणाले, कोरोनाच्या  आपत्तीमधून बाहेर पडत असताना अनलॉकसाठी प्रक्रिया आपण सुरु  केल्यानंतर  मागील सहा महिन्यात टप्प्या टप्प्याने अनेक उद्योग व्यवसाय पूर्वपदावर आणले आहेत. कोरोनाचा धोका टळलेला नाही, म्हणून सावधगिरीने पावलं टाकली जात आहेत. जनजीवन पूर्वी सारखे होत असताना कोरोना लसीकरण मोहिमेला आपण सुरुवात केली आहे. लसीकरणाच्या  पहिल्या टप्प्‌यात जिल्ह्याच्या वैद्यकिय क्षेत्रातील जवळपास १७ हजार नागरीकांना मोफत लस दिली जात आहे. लसीकरणासाठी जिल्ह्यातील बीड, परळी, अंबाजोगाई, माजलगाव व आष्टी येथील शासकिय रुग्णालयांत सोय करण्यात आली आहे. येथून आत्तापर्यंत ३००८  नागरिकांना मोफत लस देण्यात आली आहे.

ते म्हणाले, पिक पाहणीच्या ऑनलाइन प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग घेऊन ई पीक पाहणी प्रयोग  राज्यात पहिल्यांदा बीड जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. रमाई आवास योजनेत मागील वर्षासाठी उद्दिष्ट पूर्ण करण्यात यश आले असून या उद्दिष्ट व्यतिरिक्त अजून 3 हजार 188 घरकुलांना मंजुरी दिली आहे. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग व्यवसाय स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून अकराशे शहान्नव प्रस्तावांना शिफारस दिली आहे.

Image

जिल्हा वार्षिक योजनेतून यावर्षी एकूण जवळपास 394 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे त्यापैकी जिल्ह्यास 305 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. यातील सर्वसाधारण योजनेत 288 कोटी रुपये, अनुसूचित जाती  उपयोजनेत 92 कोटी रुपये आणि आदिवासी बाह्यक्षेत्र  उपयोजना यातून 1 कोटी 74  लाख‍ रुपये आहेत. जनतेसाठी असंख्य कामे पूर्ण केली जातील असे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

ध्वजारोहण समारंभानंतर हस्ते बीड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक आर.राजा यांचा राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक जाहीर झाल्याने सत्कार करण्यात आला तसेच विभागीय स्तर स्वच्छता पुरस्कार मिळालेल्या ग्रामपंचायतींचे सरपंच व  ग्रामसेवक, गुणवत्ता पूर्ण कामगिरी करणार्‍या विद्यार्थी विद्यार्थिनी आणि नागरिकांचा प्रशस्तीपत्र , पुष्पगुच्छ देऊन सन्मान  करण्यात आला.

Image

यानंतर झालेल्या संचालनात पोलीस दलाच्या विविध पथकांनी सहभाग व मानवंदना दिली यासह संचलनात पोलीस दलाचे वरूण वाहन , वज्र वाहन, अँम्ब्युलन्स,  कृषी विभागाचा चित्ररथ यांनी सहभाग घेतला

ध्वजारोहण समारंभास अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, बीड जिल्हा निवडणूक अधिकारी  प्रवीण धरमकर, उपजिल्हाधिकारी  प्रकाश पाटील यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवर व नागरीक यांची भेट घेऊन पालक मंत्री श्री मुंडे यांनी सदिच्छा दिल्या.

Image

पोलीस अधीक्षक आर. राजा यांचा सन्मान

बीड जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. आर. राजा स्वामी यांना राष्ट्रपती यांचे शौर्य पदक जाहीर झाले आहे. याबद्दल पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व सन्मान करण्यात आला.

Image

तसेच बीड जिल्हा पोलीस दलाचे तीन अंमलदार पोलीस हवालदार-247 श्री मोहन आश्रुबा क्षीरसागर नेमणूक  स्था. गुन्हे शाखा बीड, पो.ना.275 श्री गणेश भिमराव दुधाळ नेमणुक महामार्ग सुरक्षा व पो.ना. नरेंद्र विश्वनाथ बांगर नेमणुक स्था. गुन्हे बीड यांना मा. पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह प्राप्त झालेले आहे त्यांचा  पालकमंत्र्यांच्या हस्ते  सन्मान चिन्ह  प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचयतींचा सत्कार पालकमंत्री श्री. मुंडे यांच्या हस्ते करण्यात आहे.

Image

बीड जिल्ह्यातील विभागातून प्रथम पुरस्कार  प्राप्त ग्रामपंचायत कोळवाडी ता.बीड, ( ग्रामसेवक श्री. सखाराम विठोबा काशिद  सरपंच सौ. सुदामती महादेव ढेरे )  ग्रामपंचायत मस्साजोग ता केज ( ग्रामसेवक श्री धनंजय आबाराव खामकर सरपंच सौ. अश्विनी संतोष देशमुख)  व ग्रामपंचायत कुसंळंब ता. पाटोदा ( ग्रामसेवक श्री दिपक कुंडलिक वाघमारे सरपंच सौ रोहिणी सतिश पवार)  या ग्रामपंचायतींना विभागून देण्यात आला.

Image

विभागातून व्दितीय पुरस्कार ग्रामपंचायत नाळवंडी ता.बीड, (ग्रामसेवक श्री भाउसाहेब नवनाथ मिसाळ सरपंच श्री राधाकिसन लक्ष्मण म्हेत्रे ) ग्रामपंचायत सांडरवण ता. बीड (ग्रामसेवक श्री सत्यवान विक्रम काशिद सरपंच श्री पांडुरंग नारायण धारकर ) व ग्रामपंचायत टोकवाडी ता.परळी या ग्रामपंचायतींना विभागून देण्यात आला तर विभागातून तृतीय पुरस्कार ग्रामपंचायत गोमळवाडा ता. शिरूर कासार (ग्रामसेवक श्री प्रविण सूर्यभान मिसाळ सरपंच श्री सुदाम श्रीरंग काकडे ) व ग्रामपंचायत सनगाव ता. अंबाजोगाई ( ग्रामसेवक श्री  नारायण विठठलराव पवार सरपंच सौ. सुलभा संजय मुंडे ) या ग्रामपंचायतीना  विभागुन देण्यात आला.याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार नागरिक तसेच गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.