कोरोनापासुन स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने लस टोचुन घ्यावी – पालकमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

Image

जालना, दि. 26 :- देशातील वैज्ञानिकांच्या अथक परिश्रमातुन कोरोनावरील लस निर्माण करण्यास यश मिळाले आहे. भारतामध्ये तयार करण्यात आलेली स्वदेशी अशी कोरोनावरील लस ही अत्यंत सुरक्षित आहे. कोरोनापासुन स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने लस टोचुन घेण्याचे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.

Image

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्‍त पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री श्री टोपे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी जनतेला उद्देशुन संदेश देताना ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, नगरपरिषदेच्या अध्यक्षा श्रीमती संगिता गोरंट्याल, माजी आमदार संतोष सांबरे, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उप विभागीय अधिकारी संदीपान सानप आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Image

पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, गतवर्ष हे कोरोनाचा मुकाबला करण्यात गेले. या काळामध्ये केंद्र व राज्य शासनाला लॉकडाऊनसारखा निर्णय घ्यावा लागला. जनतेच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयाचे जनतेने स्वागत करुन कोरोनापासुन बचाव करण्यासाठी दिलेल्या सुचना व‍ निर्देशांचे तंतोतंत पालन केले. कोरोनाचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी शासनाला सहकार्य केल्याबद्दल जनतेचे आभार व्यक्त करत कोरोनाच्या काळामध्ये सर्वसामान्यांना आरोग्याच्या सेवा देण्याबरोबरच त्यांचे रक्षण करणाऱ्या प्रत्येक कोव्हीड योद्धयांना सलाम करणे हे माझे कर्तव्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.देशातील वैज्ञानिकांच्या अथक परिश्रमातुन कोरोनावरील लस निर्माण करण्यास यश मिळाले आहे. 16 जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाचा संपुर्ण देशात ऑनलाईन पद्धतीने शुभारंभ केला. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य सेवकांना लस टोचण्यात येत असुन देशामध्ये आतापर्यंत 10 लाख तर महाराष्ट्र राज्यात एक लाखापेक्षा अधिक आरोग्य सेवकांना लस टोचण्यात आली आहे. राज्यात आठवड्यातुन पाच दिवस लसीकरण करण्यात येत असुन दररोज 28 हजार जणांना लस देण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यातील जनतेला आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या प्रमाणात देण्यासाठी कोरोना काळात जिल्ह्यात स्वतंत्र असे कोव्हीड रुग्णालय, व्हेंटीलेटर, बेड, लिक्वीड ऑक्सिजन, अत्याधुनिक प्रकारच्या सेवा यासह आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या असुन जनसामान्यांच्या मनामध्ये सरकारी दवाखान्याविषयी एक विश्वासार्हता निर्माण करण्याचे काम आरोग्य सेवक तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केले असल्याचा अभिमान वाटत असल्याचे सांगत येणाऱ्या काळात जालना जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय, आयुष रुग्णालय, मनोरुग्णालय यासारख्या सुविधा उपलब्ध करुन देत हे ठिकाण एक हेल्थ हब होण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील प्रत्येक व्यक्तीचा आरोग्य विमा उतरवुन त्यांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातुन दीड लाख रुपयांपर्यंत आरोग्य सेवा 1 हजार रुग्णालयांच्या माध्यमातुन उपलब्ध करुन देणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील एकमेव राज्य असुन या योजनेचा अधिकाधिक प्रमाणात प्रचार, प्रसार करण्याची सुचना करत या योजनेचा जनतेने लाभ घेण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी केले.महाराष्ट्र राज्य हे एक कृषिप्रधान राज्य असुन शेतकरी हा देशाच्या पाठीचा कणा आहे. बळीराजाचा सर्वांगिण विकास होण्याच्यादृष्टीने शासनाने अनेकविध निर्णय घेतले. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत सप्टेंबरअखेरपर्यंत 1 लाख 59 हजार 522 शेतकऱ्यांच्या खात्यावर 996 कोटी 77 लक्ष रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली आहे. आतापर्यंत 1 लाख 66 हजार 185 शेतकऱ्यांच्या बँक खात्यांचे आधार प्रमाणिकरण करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यासाठी सन 2020-21 या वर्षात खरीप पीककर्ज 1 हजार 600 कोटी तर रब्बी पीककर्ज वाटपासाठीचा 484 कोटी 68 लक्ष असा आहे. जिल्ह्यातील 23 बँकांच्या एकुण 173 शाखांच्या माध्यमातुन खरीपासाठी 990 कोटी 97 लक्ष तर रब्बीसाठी 273 कोटी 15 लक्ष अशाप्रकारे एकुण 1264 कोटी 11 लक्ष रुपयांचे पीककर्जाचे वाटप करण्यात आले असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.

Image

गोरगरीब जनतेला केवळ पाच रुपयांमध्ये पोटभर जेवण उपलब्ध व्हावे यादृष्टीने शासनाने शिवभोजन योजना सुरु केली. गतवर्षामध्ये जिल्ह्यातील 15 शिवभोजन केंद्राच्या माध्यमातुन 4 लक्ष 20 हजार थाळयांचे वाटप करण्यात आले असल्याचे सांगत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनांतर्गत असलेल्या काही योजनांच्या संयोजनातुन शरदचंद्रजी पवार ग्रामसमृद्धी योजना 15 डिसेंबरपासुन राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्याला गायी व म्हशींसाठी पक्का गोठा बांधणे, शेळीपालन, कुक्कुटपालन शेड बांधणे तसेच भू-संजिवनी नाडेप कंपोस्टींगसाठी अनुदान देण्यात येत असुन या योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री टोपे यांनीयावेळी केले.नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील 363 गावांची निवड करण्यात येऊन 13 हजार 314 लाभार्थ्यांना 101 कोटी 21 लक्ष रुपयांच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.माहे जुन ते ऑक्टोबर, 2020 मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे मयत झालेल्या व्यक्ती, पशुधन, घरांची पडझड तसेच अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेले नुकसान व जमिनी खरडुन गेल्याने झालेल्या नुकसानीपोटी वाढीव दराने 532 कोटी 74 लक्ष रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होते. त्यापैकी आजपर्यंत 466 कोटी 38 लक्ष रुपये जिल्ह्यातील आपदग्रस्तांच्या खात्यावर जमा करण्यात आले असुन उर्वरित अनुदानही लवकरच नुकसानग्रस्तांच्या खात्यावर जमा होणार असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.

May be an image of 1 person, standing and flower

महाराष्ट्र राज्य कृषि क्षेत्रामध्ये अग्रेसर रहावे म्हणुन ऊर्जा विभागाने राज्यातील प्रत्येक कृषीपंप वीज ग्राहकाला त्याच्या मागणीप्रमाणे वीज जोडणीचा पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी नवीन कृषीपंप वीज जोडणी धोरण 2020 जाहीर केले आहे. या धोरणांतर्गत कृषीपंप ग्राहकांना 600 मीटरपर्यंत किंवा त्यापेक्षाही जास्त अंतरावरील वीज जोडणीचा/सौर ऊर्जापंपाचा पर्याय उपलब्ध करण्यात आलेला आहे. कृषीपंप ग्राहकास तात्काळ वीज जोडणी पाहिजे असल्यास ग्राहकाने स्वत: खर्च करण्याची मुभा असुन त्याचा परतावा वीज बिलाद्वारे करण्यात येणार आहे. कृषी ग्राहकांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार असुन याकरिता स्वतंत्र ऑनलाईन लँड बँक पोर्टल तयार करण्यात आलेले आहे. याकरिता 33/11 केव्ही उपकेंद्रापासुन ५ कि.मी. च्या परिघामध्ये शासकीय, गायरान, खासगी जमीन उपलब्ध असल्यास तेथे सौर कृषी प्रकल्पाची उभारणी करुन त्याद्वारे शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा दिला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.कृषीपंपाच्या वीज बिलातही सवलत देण्यात येत असुन त्यानुसार प्रथमवर्षी सुधारित थकबाकीच्या 50 टक्के रक्कम भरल्यास वीजबिल कोरे करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र संबंधित कृषीपंप ग्राहकाला चालुबिल भरणे क्रमप्राप्त राहील आणि चालु बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. ग्राहकांना सुधारित थकबाकी भरण्यासाठी 3 वर्षाची सवलत देण्यात आली असुन या धोरणांतर्गत सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शक होण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्यात आलेला आहे.महाराष्ट्र राज्य हे एक कृषिप्रधान राज्य असुन शेतकरी हा देशाच्या पाठीचा कणा आहे. बळीराजाचा सर्वांगिण विकास होण्याच्यादृष्टीने शासन व प्रशासनातील सर्व घटकांनी या योजनेचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच शेतकऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी केले.

May be an image of 7 people and people standing

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगार प्राप्तीसाठी सहाय्य करणे, पुर्वानुभवाने प्राप्त कोशल्याचे प्रमाणिकरण करणे, खासगी क्षेत्रातील प्रशिक्षण केंद्राचा सहभाग वाढविणे आणि सन 2020-21 मध्ये देशातील आठ लाख युवकांना लाभ देणे हा उद्देश असलेल्या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपामध्ये किटचे वाटप करुन पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

May be an image of 3 people and people standing

शेतकऱ्यांना सौर कृषीपंपाचे कोटेशनचे वितरण

शेतकऱ्यांना पारेषण विरहित सौर कृषीपंप बसविण्याची योजना महाराष्ट्र शासनाने सुरु केली असुन प्रातिनिधीक स्वरुपामध्ये शेतकऱ्यांना पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते सौर कृषीपंपाच्या कोटेशनचे वितरण याप्रसंगी करण्यात आले.यावेळी पालकमंत्र्यांनी परेडचे निरीक्षण केले. परेडमध्ये पोलीस दल, राज्य राखीव पोलीस बल गट, महिला पोलीस दल, होमगार्ड, बँडपथक, महिला सुरक्षा दामिनी पथक, दंगल नियंत्रण पथक, अग्निशामक दलासह विविध विभागाच्या चित्ररथांचा समावेश होता.यावेळी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे संचलन संजय कायंदे यांनी केले.