दुसऱ्या महायुद्धावर आधारित डॅनिश चित्रपट इन टू द डार्कनेस ठरला इफ्फी 51 सुवर्ण मयूर पुरस्काराचा मानकरी

द सायलेंट फॉरेस्ट चित्रपटासाठी तैवानचे  दिग्दर्शक चेन-निएन को यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार तर  त्झू-चुआन लिऊ यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
आय नेव्हर क्राय मधील भूमिकेसाठी पोलिश अभिनेत्री झोफिया स्टॅफिएज यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

पणजी, 24 जानेवारी 2021:

डेन्मार्क मधील इलेक्ट्रॉनिक्स कारखान्याच्या  मालकाला नाझी सैन्यासाठी उत्पादन करण्यास भाग पाडण्यात आले होते या कथानकावर आधारित चित्रपट  इन टू द डार्कनेस/ De forbandede år  या चित्रपटाने आज समारोप  झालेल्या 51व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठित सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला आहे. अँडर्स रेफन दिग्दर्शित, 152 मिनिटांच्या  या  डॅनिश चित्रपटाने नाझींच्या कब्जात देश असताना डेन्मार्कच्या जनतेला भोगाव्या लागलेल्या भावनिक समस्यांची गुंतागुंत उलगडून दाखवली आहे. नायक कार्लस्कोव्हला सामना करावा लागणाऱ्या मानसिक संघर्षाचे प्रभावी चित्रण यात करण्यात आले आहे. एकीकडे, त्याला त्याच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी जर्मन बाजारपेठेचे उत्पादन चालू ठेवण्यास आक्रमकांद्वारे भाग पाडले जात आहे तर दुसरीकडे, या निवडीच्या नैतिक अनिश्चिततेमुळे त्याच्या कुटुंबालाही यातना सोसाव्या लागत आहेत.

तैवानच्या दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्या  चेन-नियन को यांना त्यांच्या 2020 च्या मँड्रिन भाषेतील चित्रपट द साइलेंट फॉरेस्ट साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा रौप्य मयूर पुरस्कार प्राप्त झाला आहे. गतिमंद मुलांच्या शाळेत घडणाऱ्या लैंगिक अत्याचाराचे वास्तववादी आणि हृदयस्पर्शी प्रदर्शन या चित्रपटातून करण्यात आले आहे.

कर्णबधिरांच्या जगातील वास्तविक घटनांवर आधारित 108 मिनिटांच्या या चित्रपटात नुकत्याच एका विशेष शाळेत दाखल केलेल्या चांग चेंग या कर्णबधिराच्या नजरेतून हे कथानक मांडण्यात आले आहे. पीडितांना  सावज बनवून  त्यांचा कसा बळी जातो याविषयीची ही वेदनादायक कहाणी तैवानमधील एका शाळेतील सत्यघटनेवर आधारित आहे.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीच्या रौप्य मयूर पुरस्कारात प्रमाणपत्र आणि 15 लाख रुपये रोख रक्क्म  यांचा समावेश आहे.

उल्लेखनीय म्हणजे, सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी रौप्य मयूर पुरस्काराने 17 वर्षीय तझू-चुआन लियू याला गौरविण्यात आले. त्याने  चांग चेंग या प्रमुख भूमिकेतून दिव्यांग मुलाचे भावविश्व समर्थपणे उलगडून दाखविले. लियू हा 76 हॉरर बुक स्टोअर (2020) आणि ऑन चिल्ड्रेन (2018) मधील भूमिकांसाठी देखील ओळखला जातो. प्रमाणपत्र आणि दहा लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या साठीचा रौप्य मयूर पुरस्कार पोलिश अभिनेत्री झोफिया स्टॅफिएज हिला ”आय नेव्हर क्राय” या चित्रपटातील भूमिकेसाठी प्राप्त झाला आहे ज्यात तिने परदेशातील नोकरशाहीच्या चक्रव्यूहातून स्वतःच्या वडिलांचा मृतदेह ताब्यात घेताना स्वतःची वाट चोखाळत करावा  लागणारा  संघर्ष चपखलपणे मांडला आहे. स्टॅफिएजला पुरस्कार स्वरूपात 10 लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र मिळाले. स्टॅफिएज ही स्प्रावा टोमका कोमेन्डी (2020) , 25 लाटनीव्हिनोस्की आणि मार्सेल (2019) या चित्रपटांसाठी देखील ओळखली जाते.

इफ्फी 51 चा विशेष ज्युरी पुरस्कार बल्गेरियन दिग्दर्शक कामिन कालेव यांच्या सन  2020  मधील  ”फेब्रुवारी”  चित्रपटासाठी देण्यात आला आहे. या चित्रपटात आठ, अठरा आणि ब्याऐशी या तीन वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींची  जीवनकथा सांगण्यात आली आहे. आयुष्य म्हणजे विविध अवतारातील सातत्य असून माणसं  म्हणजे केवळ विस्तीर्ण आकाशाच्या खाली असलेल्या या विस्तीर्ण मोकळ्या धरतीवरील ठिपके आहेत हा जीवनाचा दृष्टिकोन काव्यमय रूपकातून सादर करण्यात आला आहे. दिग्दर्शक कामिन कालेव एक लेखक देखील आहेत आणि ईस्टर्न प्लेज (2009) आणि फेस डाउन (2015) साठीसुद्धा  ते ओळखले जातात.

दिग्दर्शक कामिन कालेव यांना रौप्य मयूर, प्रमाणपत्र आणि 15 लाख रुपयांचा रोख पुरस्कार प्रदान करण्यात आला.

इफ्फी 51 चा विशेष उल्लेखनीय पुरस्कार भारतीय दिग्दर्शक कृपाल कलिता यांना त्यांच्या आसामी चित्रपट ” ब्रिज ”साठी प्रदान करण्यात आला आहे ज्यात ग्रामीण आसाममध्ये दरवर्षी येणाऱ्या  पुरात सोसाव्या लागणाऱ्या हालअपेष्टांचे चित्रण करण्यात आले आहे. या चित्रपटाद्वारे शक्तिशाली ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांमुळे दरवर्षी  येणारा पूर आणि शेतीचे नुकसान यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. कलिता यांना पुरस्काराच्या रूपात प्रमाणपत्र मिळाले.

सर्वोत्कृष्ट  दिग्दर्शक  पदार्पण हा  पुरस्कार ब्राझीलचे  दिग्दर्शक कोसिओ परेरा डॉस सॅंटोस यांना 2020 मधील  पोर्तुगिज  चित्रपट ” व्हॅलेंटिना ”’ यासाठी  देण्यात आला आहे. सतरा वर्षांच्या ब्राझीलियन समलिंगी मुलीची कथा यात मांडण्यात आली आहे .  तिच्या आईबरोबर सामान्य जीवन व्यतीत करणे हा तिचा एकमेव उद्देश आहे.

दिग्दर्शक सॅंटोस यांनी ब्राझीलमधील  विद्यापीठातून  सिनेमाचा अभ्यास केला, जिथे त्यांनी  अनेक चित्रपट आणि माहितीपट दिग्दर्शित केले. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांचे चित्रपट निवडले गेले आहेत. त्यांना 50 हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.

इफ्फी 51  अर्थात 51 व्य  भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील विविध श्रेणीतील  पुरस्कारांचा निर्णय  हा अर्जेंटिनाचे दिग्दर्शक पाब्लो सीझर यांच्या अध्यक्षतेखाली जगभरातील नामवंत चित्रपट निर्मात्यांचा समावेश असलेल्या  ज्युरी  मंडळाने घेतला आहे. प्रसन्ना विथानाज (श्रीलंका), अबू बकर शौकी (ऑस्ट्रिया), प्रियदर्शन (भारत) आणि रुबैयत हुसेन (बांगलादेश) हे ज्युरीमंडळाचे  अन्य सदस्य होते.

एका व्हिडिओ संदेशामध्ये ज्युरी अध्यक्ष पाब्लो सीझर यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धा प्रकारातील चित्रपटांचे मूल्यांकन करण्यासाठी ज्यूरीना दिलेल्या संधीबद्दल महोत्सवाचे आभार मानले. “महोत्सवासाठी निवडलेल्या चित्रपटांमध्ये, विस्तृत आणि विविध संकल्पना मांडल्या गेल्याचा आम्हाला विशेष आनंद आहे. वैयक्तिक स्वातंत्र्य, मुलांचे आणि या जगातील सर्व लोकांचे अधिकार आणि स्त्रियांचे सबलीकरण आणि काही लोकांनी सादर केलेल्या गोष्टींच्या स्मृती आम्हाला विशेष भावल्या. आशयघन आणि सौंदर्यप्रधान चित्रपटांच्या निवडीबद्दल इफ्फीचे आभार.”

51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (आयएफएफआय) सांगता सोहळा  गोव्याच्या  ताळीगाव मधील श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर  स्टेडियम येथे  आज, 24,जानेवारी  2021 रोजी दिमाखात पार पडला . या सोहळ्यासाठी  ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री झीनत अमान आणि  अभिनेता रवि किशन हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित  होते, तर ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माता विश्वजित चटर्जी यांना इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार देऊन  गौरवण्यात आले. .

खासदार रवि किशन, आंतरराष्ट्रीय ज्युरीचे सदस्य, दिग्दर्शक प्रियदर्शन नायर, इफ्फी  सुकाणू समितीचे सदस्य  शाजी एन. करुण,  निर्माते राहुल रावेल, मंजू बोरा आणि रवि कोट्टरकर आणि देश-विदेशातील मान्यवर या समारंभाला उपस्थित होते.

गोव्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी  यांनी सध्याच्या कठीण काळातही या महोत्सवाचे उत्तम आयोजन केल्याबद्दल  आयोजकांचे कौतुक केले.चित्रपट मेंदूतून  नाही तर हृदयातून  येतो, इफ्फी सारखे चित्रपट महोत्सव आपल्याला जग एक असल्याची आठवण करून देतात असे  कोश्यारी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो म्हणाले की, इफ्फीच्या या आवृत्तीने  सर्व प्रकारच्या अडचणींवर मात केली आणि  ते उत्कृष्टतेचे योग्य व्यासपीठ म्हणून उदयाला आले आहे. “यावर्षी सिनेमा वेगवेगळ्या रूपात म्हणजेच प्रत्यक्ष आणि ऑनलाईन अशा भिन्न स्वरूपात आपल्याकडे आला”, असे सांगत त्यांनी संमिश्र स्वरूपात महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल इफ्फीचे अभिनंदन केले.

या आवृत्तीच्या काही उल्लेखनीय वैशिष्ट्यांचा आढावा घेताना ते म्हणाले: “यावर्षी बांग्लादेश हा फोकस कंट्री  होता तसेच आपण महान दिग्दर्शक सत्यजित रे यांना आदरांजली म्हणून त्यांचे चित्रपट दाखविले .

इफ्फी सर्जनशीलतेचे सुंदर उदारहण  असल्याचे सांगून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्व चित्रपट कलाकार, तंत्रज्ञ , प्रतिनिधी आणि आयोजकांचे अभिनंदन केले. “गोवा आता फक्त सूर्य, वाळू आणि समुद्रासाठीच ओळखला जाणार नाही; इको पर्यटनाला चालना देण्याबरोबरच  राज्याच्या विकासासाठी अनेक पावले उचलली जात आहेत. गोव्यात चौथा आंतरराष्ट्रीय पक्षी महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. ती एक  राज्याच्या नैसर्गिक सौंदर्याचा साक्षीदार बनण्याची उत्तम संधी  असेल,असे ते म्हणाले.

इंडियन पर्सनालिटी ऑफ द इयर पुरस्कार स्वीकारताना ज्येष्ठ अभिनेते विश्वजित चॅटर्जी  म्हणाले: “मला या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मी केंद्र  सरकार आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाचे मनापासून आभार मानतो. यावर्षी, आम्हाला समजले की बांगलादेश हा आपला फोकस कंट्री आहे, ज्या देशाशी माझे खूप जवळचे संबंध आहेत. जेव्हा बांगलादेशवर हल्ला होत होता तेव्हा मुंबईत महान दिग्दर्शक ऋत्विक घटक माझ्या बरोबर होते आणि आम्हाला बंगबंधू  शेख मुजीबुर रहमान यांच्या भाषणांमधून प्रेरणा मिळत होती.

यावेळी प्रसारित केलेल्या एका व्हिडिओ संदेशामध्ये प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन म्हणाले: “जग एका  अभूतपूर्व परिस्थितीतून जात आहे. आव्हानांना संधींमध्ये रूपांतरित करण्याचे इफ्फी हे एक   उत्तम उदाहरण आहे.

माहिती आणि  प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे म्हणाले की, इफ्फीची  ही आवृत्ती खास आहे कारण संमिश्र पद्धतीने चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यास  भारत सक्षम आहे. “संपूर्ण आशियामध्ये हे प्रथमच घडले आहे.  केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिवांनी 51 व्या इफ्फी  साठी पुरस्कार निवडण्यासाठी डिजिटल इंटरफेसचे नेतृत्व केल्याबद्दल  प्रियदर्शन यांचे आभार मानले. “हे खूप छान झाले की 51 वा इफ्फी आणि बांगलादेशच्या स्वातंत्र्य आणि मुक्तीचा 50 वा  वर्धापनदिन एकाच वर्षी आला आणि इफ्फीच्या या आवृत्तीसाठी बांगलादेश फोकस कंट्री देखील होता. ”

एन्टरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सतीजा म्हणाले की, आपल्याकडे इच्छाशक्ती व योग्य वृत्ती असेल तर यशस्वी होऊ शकतो  याचे उदाहरण म्हणून 51 वा इफ्फी कायम स्मरणात राहील.

शांतता, सहिष्णुता आणि अहिंसा  हे  महात्मा गांधींचे आदर्श प्रतिबिंबित करणाऱ्या चित्रपटासाठी असलेला विशेष  आयसीएफटी युनेस्को गांधी पुरस्कार हा अमीन नायफेह यांच्या 2020 मधील  ”200 मीटर”  या अरेबियन चित्रपटाला मिळाला आहे ज्यात मध्यपूर्वेतील इस्रायलच्या ताब्यात  असणाऱ्या प्रदेशात राहणाऱ्या पॅलेस्टीनी  वडिलांची कथा आहे जे दुभाजक भिंतीच्या एका बाजूला आहेत तर त्यांचा मुलगा पलीकडच्या बाजूला रुग्णालयात आहे आणि ते त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रमाणपत्र आणि पदक असे या पुरस्काराचे स्वरूप असून इंटरनॅशनल कौन्सिल फॉर फिल्म, टेलिव्हिजन आणि ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन (आयसीएफटी) पॅरिसच्या सहकार्याने इफ्फीच्या सहभागाचा भाग म्हणून हा पुरस्कार देण्यात येतो.

51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हिंदी भाषेतील ऑस्ट्रियन चित्रपट आणि मिड फेस्ट फिल्म ‘मेहरूनिसा’ या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर पार पडला.

पत्रकार परिषदेत बोलताना दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक संदीप कुमार म्हणाले: “चित्रपटाची भावना भारतीय आहे, आणि म्हणूनच आम्हाला भारतीय भूमीवर याचा प्रीमियर करायचा होता. मेहरनिसासह इफ्फीमध्ये सहभागी होणे हे माझे भाग्य आहे. . या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादाने आम्ही खूप भारावून गेलो आहोत. 40 वर्षांहून अधिक काळ भारतीय चित्रपटसृष्टी गाजवलेल्या भारतीय सिनेमातील या महान अभिनेत्रीला हा मानाचा मुजरा आहे.”

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) 51 व्या आवृत्तीचा समारोप कियोशी कुरोसावा दिग्दर्शित जपानी चित्रपट वाईफ ऑफ ए स्पाय ने झाला. काही अप्रत्याशित परिस्थितीमुळे बेदखल झालेल्या एका पती – पत्नीची कहाणी यामध्ये मांडण्यात आली आहे. भावनिक चढउतारांच्या कथेत, जिथे मत्सराच्या भावनेतून एका पत्नीला ग्रासलेले असताना, जेव्हा तिला सत्याची बाजू कळते, तेव्हा तिच्या कुटुंबाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अनपेक्षित  काहीतरी करते.

कुरोसावा, ज्यांनी इफ्फी 51 च्या समारोप समारंभात व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले, ते म्हणाले, “इफ्फीच्या समारोपासाठी वाईफ ऑफ ए स्पाय या चित्रपटाची निवड होणे ही खूप अभिमानाची बाब आहे. मी साधारण सहा ते सात वर्षांपूर्वी गोव्यामध्ये आलो होतो. ती माझ्यासाठी अतिशय संस्मरणीय आठवण आहे. तिथे प्रत्येक गोष्ट अतिशय सुंदर आहे, समुद्र, शहर आणि येथील माणसे अतिशय प्रेमळ आहेत. प्रामुख्याने येथील जेवण अतिशय चविष्ट होते. मी अगदी स्वप्नवत दिवस येथे घालविले. मला खरेतर प्रत्यक्ष तेथे येऊनच आपल्या सर्वांची भेट घेण्याची इच्छा होती पण मला माहीत आहे, की सध्या ही गोष्ट अशक्य आहे. जपानमधून ऑनलाइन माध्यमातून तुमच्याशी संवाद साधणे ही एकच गोष्ट सध्या मी करू शकतो. पण सिनेमा सातासमुद्रापार पोहोचला आणि माझी खात्री आहे की मी या सिनेमाबाबत काही सांगण्यापेक्षा सिनेमाच तुम्हाला स्पष्टपणे सगळे सांगेल. माझा सिनेमा हा जपानमधील 1940 चा काळ आहे आणि तो एका जोडप्याच्या दयनीय काळाचे चित्रण आहे.“ अशा प्रकारे संवाद साधत असतानाच किरोसावा यांनी सर्वांना विनंती केली की शेवटपर्यंत सिनेमा पाहून त्याचा आनंद घ्यावा.

सिने अभिनेत्री  सिमोन सिंग यांनी सांगता समारंभाचे सूत्रसंचालन केले.

51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 60  देशांचे 126 हून अधिक चित्रपट दाखवण्यात आले  ज्यात 50 भारतीय प्रीमियर,  22 आशियाई प्रीमियर, 7  वर्ल्ड प्रीमिअर आणि  6 आंतरराष्ट्रीय प्रीमियर होते.