सिंचन प्रकल्प भरल्यानंतर पाणी प्रश्नांप्रति तेवढीच जागरुकता अत्यावश्यक – पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड (जिमाका) दि. 23 :- समन्यायी पाणी वाटप हा दिवसेंदिवस अत्यंत आव्हानात्मक विषय बनत चालला असून उपलब्ध असलेल्या पाण्याचा काटेकोर वापर ही काळाची गरज आहे. मराठवाड्यातील धरणे भरायला आता पाचपेक्षा अधिक वर्षांचा कालावधी लागत आहे. पाणी नसताना पाण्याप्रति सर्व जागरुक होतात मात्र एकदा धरणे भरली की त्यावर्षी पाण्याच्या समन्यायी वाटप व पाणीप्रश्नांबाबत कोणी बोलत नाही, अशी खंत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज बोलून दाखविली. जे पाणी दुष्काळसदृश परस्थितीनंतर उपलब्ध होत असेल तर त्याच्या इतर उपयोगासमवेत कालव्याद्वारे शेताच्या बांधापर्यंत पोहचणाऱ्या पाण्यासाठीही सर्वांनी तेवढेच दक्ष असले पाहिजे, या शब्दात पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पाणी प्रश्नाप्रति गांभीर्य सर्वांच्या लक्षात आणून दिले.

नांदेड जिल्ह्याला वरदान ठरलेल्या उर्ध्व पैनगंगा प्रकल्प, पूर्णा प्रकल्प, मानार प्रकल्प, शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाच्या पाणी नियोजनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे आज संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मंगाराणी आंबुलगेकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार रावसाहेब अंतापुरकर, आमदार राजेश पवार, आमदार मोहन हंबर्डे, आमदार श्यामसुंदर शिंदे, गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राजूभैय्या  नवघरे, राष्ट्रीय साखर संघ नवी दिल्लीचे अध्यक्ष जयप्रकाश दंडेगावकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार, अधीक्षक अभियंता उप्पलवार, भाऊराव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके, मारोतराव कवळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पाण्याची जेंव्हा शंभर टक्के उपलब्धता असते तेव्हा कॅनलची दुरुस्ती, कॅनलमधील गाळ या साऱ्या बाबी अपेक्षित जरी असल्या तरी धरणातील पाणी नियोजन केलेल्या कॅनलद्वारे शेवटच्या बांधापर्यंत पोहोचले पाहिजे. या पाण्याचा होणारा अपव्यय जर टाळायचा असेल तर या सर्व कामात काटेकोरपणा आला पाहिजे. डागडुजीविना कॅनल जर योग्य स्थितीत नसतील अथवा त्यात झाडी झुडपी वाढून कॅनल खराब झाले असतील तर वेळेच्या आत पाणी वाटपाच्या पाळ्या लक्षात घेऊन पूर्वीपासूनच याची डागडुजी प्राधान्याने हाती घ्यायला हवी असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट करुन विविध प्रकल्पातील पाण्याचे रोटेशन हे नियोजन केल्याप्रमाणे पोहचलेच पाहिजे,असे निर्देश जलसंपदा विभागाला दिले.

या बैठकीत आमदार बालाजी कल्याणकर, आमदार रावसाहेब अंतापुरकर, आमदार राजेश पवार, आमदार मोहन हंबर्डे, आमदार श्यामसुंदर शिंदे, गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राजूभैय्या  नवघरे, राष्ट्रीय साखर संघ नवी दिल्लीचे अध्यक्ष जयप्रकाश दंडेगावकर यांनी कालव्याद्वारे पाणी वाटप होताना येणाऱ्या अनेक अडचणी निदर्शनास आणून दिल्या.

या बैठकीत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला. पूर्णा प्रकल्पांतर्गत येलदरी व सिध्देश्वर दोन धरणे असून या वर्षी धरणात 980.73 दलघमी (100 टक्के) पाणी आले. यातून प्रकल्पात आलेला गाळ व बाष्पीभवन 228.25 दलघमी वजा करता 662.48 दलघमी पाणी वापरासाठी उपलब्ध होणार आहे. पिण्यासाठी परभणी, हिंगोली, जिंतूर, वसमत, औंढा नागनाथ ही शहरे व ग्रामीण भागासाठी 78.78 दलघमी पाणी आरक्षीत केले आहे. सिंचनासाठी 583.69 दलघमी पाणी उपलब्ध असून या पाण्यातून सुमारे 55 हजार हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी रब्बी हंगामात 3 पाणी पाळया व उन्हाळी हंगामात 4 पाणी पाळयाचे नियोजन केले आहे. त्याच्या तारखा पुढील प्रमाणे आहेत. 25 नोव्हेंबर, 2020 (पूर्ण), 27 डिसेंबर,2020 (पूर्ण), 25 जानेवारी, 2021, 1 मार्च, 2021,27 मार्च 2021, 23 एप्रिल 2021, 19 मे 2021 या तारखेमध्ये आपत्कालीन परिस्थितीत बदल होऊ शकतो.

निम्न मानार प्रकल्प हा तीन वर्षानंतर पहिल्यांदाच या प्रकल्पात 100 टक्के (123.49 दलघमी) पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यातून प्रकल्पातील बाष्पीभवन व गाळ 24.88 दलघमी वजा करता 98.61 दलघमी पाणी वापरासाठी उपलब्ध होणार आहे. पिण्यासाठी नायगाव, कंधार या तालुक्यातील ग्रामीण भागासाठी 4.61 दलघमी पाणी आरक्षीत केले आहे. त्यामुळे सिंचनासाठी 94.00 दलघमी पाणी उपलब्ध झाले असून या पाण्यातून सुमारे 23 हजार हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी रब्बी हंगामात तीन तर उन्हाळी हंगामात तीन आवर्तन दिले जाणार आहे. त्याच्या तारखा अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहेत. 25 नोव्हेंबर 2020 (पूर्ण), 30 डिसेंबर 2020 (पूर्ण), 24 जानेवारी 2021, 1 मार्च 2021, 1 एप्रिल 2021, 1 मे 2021 या तारखेमध्ये आपत्कालीन परस्थितीत बदल होऊ शकतो.

उर्ध्व पैनगंगा याप्रकल्पात यावर्षी 964.10 दलघमी (100 टक्के) पाणी उपलब्ध झाले आहे. यातून प्रकल्पातील गाळ व बाष्पीभवन 176.32 दलघमी वजा जाता 787.78 दलघमी पाणी वापरासाठी उपलब्ध होणार आहे. पिण्यासाठी उमरखेड, अर्धापूर, कळमनुरी तसेच नांदेड, हिंगोली व यवतमाळ जिल्हयातील ग्रामीण भागासाठी 77.15 दलघमी पाणी आरक्षीत केले आहे. त्यामुळे सिंचनासाठी 710.64 दलघमी पाणी उपलब्ध झाले असून या पाण्यातून 86 हजार हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी रब्बी हंगामात 3 पाणी पाळया व उन्हाळी हंगामात 4 पाणी पाळयांचे नियोजन केले आहे. त्याच्या तारखा अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहेत;  27 नोव्हेंबर 2020 (पूर्ण), 31 डिसेंबर 2020 (पूर्ण), 27 जानेवारी 2021, 1 मार्च 2021, 27 मार्च 2021, 23 एप्रिल 2021 19 मे 2021 या तारखेमध्ये आपत्कालीन परस्थितीत बदल होऊ शकतो.

शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात 100 टक्के (80.79 दलघमी) पाणी उपलब्ध आहे. यावर्षी पहिल्यांदाच अंतेश्वर बॅरेज भरले असून त्यातून 21.0 दलघमी व दिग्रस बंधाऱ्यातून 24.0 दलघमी पाणी उपलब्ध होणार आहे. असे एकूण 125.95 दलघमी पाणी उपलब्ध होणार आहे. यातून बाष्पीभवन 16.32 दलघमी वजा करता 109.63 दलघमी पाणी वापरासाठी उपलब्ध होणार आहे. पिण्यासाठी नांदेड महानगरपालिका, एमआयडीसी व ग्रामीण भागासाठी 38.55  दलघमी पाणी आरक्षीत केले आहे. त्यामुळे सिंचनासाठी 71.08 दलघमी पाणी उपलब्ध झाले असून सुमारे 13 हजार हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी रब्बी हंगामात तीन पाणी पाळया दिल्या जाणार आहेत. त्याच्या तारखा अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहेत. 27 नोव्हेंबर 2020 (पूर्ण), 7 जानेवारी 2021 (चालू), 7 फेब्रुवारी 2021 या तारखेमध्ये आपत्कालीन परस्थितीत बदल होऊ शकतो.

पूर्णा प्रकल्पावर 2 वर्षापासून कालवा स्वच्छता अभियान राबविणाऱ्या मानवलोक संस्थेचा गौरव

कालव्यांची डागडुजी हा शासनस्तरावर दिवसेंदिवस आव्हानात्मक बनत चालला  आहे. हा प्रश्न सामाजिक बांधिलकी व सेवाभावातून सोडविण्यासाठी मागील दोन वर्षांपासून कालवा स्वच्छता अभियानाद्वारे सोडविणाऱ्या मानवलोक सेवाभावी संस्थेचा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत गौरव केला. जलसंपदा विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मानवलोक संस्थेने त्यांच्याकडील सात जेसीबी व इतर अत्यावश्यक यंत्रसामुग्री सेवाभावातून कामासाठी उपलब्ध करुन दिली. केवळ कालवे दुरुस्त नाहीत म्हणून शेतकरी पाण्यापासून वंचित राहू नयेत ही भूमिका मानवलोकने जपून या कामात पुढाकार घेतल्याचे या संस्थेचे कार्यवाहक अनिकेत लोहिया यांनी सांगितले.