२३ एप्रिलपासून बारावीची आणि २९ एप्रिलपासून दहावीची परीक्षा – शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड

मुंबई, दि. 21 : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावीची) लेखी परीक्षा दिनांक 23 एप्रिल तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) दिनांक 29 एप्रिलपासून सुरु होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, परीक्षा मंडळ संचालक दिनकर पाटील उपस्थित होते.

Image

प्रा. गायकवाड म्हणाल्या, इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 1 एप्रिल ते  22 एप्रिलदरम्यान होईल तर लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 29 मे 2021 या कालावधीत घेण्यात येईल. या परीक्षेचा निकाल अंदाजे जुलै 2021 च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल.

Image

इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा 9 एप्रिल ते 28 एप्रिल या दरम्यान होतील तर लेखी परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 31 मे 2021 या कालावधीत घेण्यात येतील. या परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2021 च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल.

कोविड 19 च्या संदर्भात केंद्र व राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

राज्यात इ. 9 वी ते इ.12 वी च्या शाळांमध्ये दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत असून दि.18 जानेवारी 2021 रोजी 21 लाख 66 हजार 56 विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत व 21 हजार 287 शाळा सुरू आहेत. यात एका दिवशी केवळ पन्नास टक्के उपस्थिती ठेवून शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. सुमारे 76.8% विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत. अशी माहिती प्रा. गायकवाड यांनी यावेळी दिली.