आपण आपल्या जीवनातील परिस्थितीपासून पळू शकत नाही, जाणीवेच्या मदतीने आपण त्याचा सामना केला पाहिजे आणि त्यातून सुखरूप बाहेर आले पाहिजे : ओंकार दिवाडकर, दिग्दर्शक स्टील अलाइव्ह

पणजी, 20 जानेवारी 2021

“माझा चित्रपट आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहचलेल्या आणि त्यायोगे मानसिक जाणीव झालेल्या एका तरुण नायिकेची कथा सांगतो. नायिकेला आत्महत्या करण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यापासून दूर पळून जायचे आहे; परंतु आपण आपल्या जीवनातील परिस्थितीपासून पळू शकत नाही, एका जाणीवेच्या मदतीने आपण त्याचा सामना केला पाहिजे आणि त्यातून सुखरूप बाहेर आले पाहिजे.” गोवा येथे आयोजित 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय पॅनोरामा विभागात आज ‘स्टील अलाइव्ह’ हा मनो-नाट्य लघुपट प्रदर्शित झाला त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते ओंकार दिवाडकर या चित्रपटा मागील प्रेरणेविषयी बोलत होते.

या चित्रपटातील मुख्य पात्र औदासीन्य आणि भावनिक गोंधळामुळे आत्महत्येचा प्रयत्न करते परंतु ती अयशस्वी होते आणि पुन्हा आपले आयुष्य जगू लागते. “प्रेक्षकांनी माझा चित्रपट साक्षीदार म्हणून पहावा अशी माझी इच्छा आहे, यामुळे जागरूकता निर्माण होईल”, असे दिग्दर्शक म्हणतात.

30 मिनिटांच्या या मराठी चित्रपटात 27 मिनिटांचा अनकट शॉट आहे. त्याविषयी बोलताना दिवाकर म्हणाले की, आत्महत्या करण्याच्या वृत्तीने झपाटलेल्या त्या व्यक्तीचा प्रवास दाखवणे आवश्यक होते.

“प्रेक्षकांना कथा सांगण्या ऐवजी त्याचा प्रभावी अनुभव देणे हा माझा उद्देश्य होता. कथेपेक्षा घटक महत्त्वाचे असतात. प्रत्येक घटक काहीतरी व्यक्त करतो. काही घटक एकत्रितपणे एक चित्र तयार करतात जे एक नवीन प्रभाव किंवा अनुभव निर्माण करते. या चित्रपटाचा समुद्र हा एक ‘घटक’ आहे जो रहस्यमय आणि अफाट आहे, जो संपूर्ण परिणाम देत आहे.” असे दिवाडकर म्हणाले.

ओंकार दिवाडकर एक लेखक, दिग्दर्शक, संपादक आणि निर्माता आहेत. ‘मृगजळांच्या भूमीत …’ (‘In the land of mirage…’) हा त्यांचा पहिला लघुपट होता. ते एक व्यावसायिक प्रवासी छायाचित्रकार देखील आहेत. ‘स्टिल अलाइव्ह’ हा त्यांचा दुसरा लघुपट असून तो मनो-नाट्य लघुपट आहे.