भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय, पंत-गिलची दमदार फलंदाजी

बॉर्डर-गावस्कर मालिकाही भारताने जिंकली

Image

ब्रिस्बेन,19 :विराट कोहलीची अनुपस्थिती, मोहम्मद शमीसारख्या गोलंदाजाची गैरहजेरी, मैदानावर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंकडून खेळला जाणारा ‘माईंड गेम’, केले जाणारे वर्णद्वेषी हल्ले, मैदानाबाहेरून ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांकडून होणारी शिवीगाळ या सगळ्या अडचणींवर मात करत भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीच्या भरवशावर कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळलेल्या भारतीय संघाने कांगारूंना त्यांच्याच भूमीत धूळ चारत कसोटी सामन्यांचा बॉर्डर-गावस्कर चषक २-१ ने जिंकून इतिहास घडवला आहे.

Image

ऑस्ट्रेलियातील प्रसार माध्यमांकडून येणारा दबाव झुगारून देत भारतीय खेळाडूंनी अतिशय दमदार कामगिरीचे प्रदर्शन करत, धाडस दाखवत ब्रिस्बेनमधील ७० वर्षे जुना विक्रम मोडला आहे.

Image

कांगारूंच्या धरतीवर जाऊन क्रिकेट खेळणे सोपे नाही याची जाणीव ठेवूनच भारतीय संघ मैदानात उतरला होता. ब्रिस्बेन येथील सामना खेळण्यापूर्वी कोरोनाची कारणं पुढे करत भारतीय खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादण्यात आले होते. भारतीय संघाचे मनोबल खच्ची करण्याचे सगळे फंडे वापरूनही ऑस्ट्रेलियन कांगारू भारतीय सिंहांपुढे ढेर झाले. ब्रिस्बेन येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात आधी गोलंदाज मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी केलेली भेदक गोलंदाजी आणि नंतर ऑस्ट्रेलियाने उभा केलेला ३२८ धावांचा डोंगर पोखरून काढताना सलामीवर शुभमन गिल आणि नंतर खेळायला आलेला ऋषभ पंत यांनी कांगारूंच्या गोलंदाजीचा घेतला दणदणीत समाचार, यामुळे भारताने सामन्यावर पकड मजबूत करत चार कसोटी सामन्यांची मालिका २-१ ने जिंकत इतिहास घडवला आहे.
 
 ३२८ धावांचे लक्ष्य घेऊनक मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने हा कसोटी सामना असला तरी दुसèया डावात वन डे सामन्याप्रमाणेच फलंदाजी केली. सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला. परंतु युवा फलंदाज शुभमन गिलने ९१ धावांची खेळी केली. त्याने चेतेश्वर पुजाराच्या साथीने भारताचा डाव सांभाळला. त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेही २४ धावा करून माघारी परतला. मग चेतेश्वर पुजाराने ऋषभ पंतला हाताशी घेत संयमी फलंदाजी केली. ५६ धावा करून तोही बाद झाला. यानंतर ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदरने दमदार फलंदाजी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवलं. जिंकण्यासाठी दहा धावांची गरज असताना सुंदर २२ धावा करून बाद झाला. यानंतर विजयासाठी तीन धावांची आवश्यकता असताना शार्दुल ठाकूर (२ धावा) माघारी परतला. मग ऋषभ पंतने (८९ धावा) विजयी चौकार लगावला आणि सामन्यासह मालिका खिशात घातली.
 
अ‍ॅडलेड कसोटीमधील लाजिरवाणा पराभव ते मालिका विजय, भारताचा हा विजय निश्चितच थक्क करणारा आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अ‍ॅडलेडमधील पहिल्या कसोटीत भारताचा संपूर्ण संघ ३६ धावांवर बाद झाला. यानंतर कर्णधार विराट कोहली वैयक्तिक कारणामुळे भारतात परतला आणि संघाचं नेतृत्त्व अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आलं. मेलबर्न कसोटीत भारताने दमदार पुनरागमन केले. त्यानंतरची सिडनी कसोटी भारताने अनिर्णित ठेवण्यात यश मिळवले. हा सामना अनिर्णित राहिला तरी भारतासाठी विजयापेक्षा कमी नव्हता. मग अखेरच्या ब्रिस्बेन कसोटीत सामना दोन्ही संघांच्या बाजूने झुकत होता. ३२८ धावांचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताने सुरुवातीला बचावात्मक खेळ केला. त्यामुळे भारत हा कसोटी सामना अनिर्णित करण्याच्या प्रयत्नात असल्याचंच चित्र होतं. परंतु शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, अजिंक्य रहाणे, वॉशिंग्टन सुंदर यांच्या झुंझार खेळीमुळे सामन्याचं चित्र पालटलं आणि हा सामना तीन गड्यांनी जिंकला.