जागरुक मतदार हे प्रगत लोकशाहीचे द्योतक -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

राष्ट्रीय मतदार दिवस व्यापक प्रमाणात साजरा करण्याचे आवाहन
कोरोना प्रतिबंधात्मक खबरदारीसह मतदार दिवस साजरा करावा

औरंगाबाद, दिनांक 19 : लोकशाही व्यवस्‍थेत मतदान प्रक्रिया हा महत्त्‍वाचा घटक असून मतदार हा लोकशाही व्यवस्‍थेची ताकद असतो. त्यामुळेच जागरूक मतदार हे प्रगत लोकशाहीचे द्योतक मानले जात असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.

Image may contain: 1 person, sitting, text that says 'ล माझे कुटुंब माझी जबाबदारी'

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित 25 जानेवारी रेाजी साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय मतदार दिवसांच्या अनुषंगाने पुर्वतयारीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, नायब तहसीलदार सिद्धार्थ धनजकर यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Image may contain: 3 people, people standing and indoor

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, देशात नि:पक्ष व पारदर्शी वातावरणात निवडणुका घेणे, हे निवडणूक आयोगाचे कार्य आहे. त्याचबरोबर नवमतदारांना मतदान व्यवस्‍थेत सामावून घेणे. त्यांना ओळखपत्र देणे, त्यांच्यात मतदानाबद्दल जाणीव जागृती निर्माण करणे यासह मतदान प्रक्रियेत सर्व पात्र मतदारांचा सक्रिय सहभाग वाढवण्याच्या दृष्टीनेही आयोग कार्यरत असतो. त्या पार्श्वभूमीवर 25 जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने मतदारांमध्ये विशेषत: नवमतदारंमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने या दिवशी नव मतदारांना मतदार यादीमध्ये नांव नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करावे. तसेच अशिक्षित आणि दिव्यांग मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याबाबत निर्देशित करून श्री. चव्हाण यांनी 25 जानेवारी रोजीचा मुख्य कार्यक्रम कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांची अंमलबजावणी करुन साजरा करण्याच्या दृष्टीने सर्व आवश्यक खबरदारी घेण्याबाबत संबंधितांना यावेळी सूचीत केले.

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी कार्यालयांनी 25 तारखेला राष्ट्रीय मतदार दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्याच्या दृष्टीने सूचना दिल्या. बैठकीच्या शेवटी उपस्थितांना जिल्हाधिकारी यांनी मतदान प्रतिज्ञा दिली. यावेळी विविध कार्यालय प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.