औरंगाबाद शहराची वेगाने प्रगतीकडे वाटचाल – पालकमंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद, दिनांक 16 : औरंगाबाद शहरात रस्ते, पाणी आणि अद्ययावत वाहतूक व्यवस्था नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येत असल्याने शहराची प्रगतीकडे वाटचाल सुरु आहे असे मनोगत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग, खनिकर्म आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री श्री. सुभाष देसाई यांनी व्यक्त केले. औरंगाबाद शहरातील रेल्वे स्थानकाच्या समोर महानगरपालिकेच्या 100 बस स्थानकाचे भूमिपूजन कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते. तसेच यावेळी स्मार्ट शहर बस-वे (मार्ग) कामाच्या कोनशिला अनावरण व स्मार्ट बस नियंत्रण कक्षाचे फित कापून उद्घाटन केले. तसेच 50 डिजिटल माहिती फलकाचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्री. देसाई म्हणाले की, औरंगाबाद महानगर पालिकेच्या माध्यमातून शहरवासियांना सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल मी शुभेच्छा देत असून सर्वात मोठी पाणीपुरवठा योजनेसाठी एक हजार 680 कोटीचा निधी मुख्यमंत्री यांनी उपलब्ध करुन दिल्याने शहराला पाण्याच्या प्रश्नाला सामोरे जाण्याची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे कचरामुक्त शहरासाठी कचरा प्रक्रिया केंद्राच्या माध्यमातून स्वच्छ शहर आणि प्रवाशांना स्मार्ट बस उपलब्ध केल्याने सोईसुविधेत भर पडली आहे, असे मत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केले.
याबरोबरच कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनी सहकार्य केले असून कोरोनामुक्त जिल्हा होण्यासाठी मास्क वापरण्याचे नागरिकांना आवाहन केले. स्मार्ट बसमध्ये ‘मास्क नाही-प्रवेश नाही’ यानुसार नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी व प्रवास करावा. कोरोनामुक्त जिल्हा होण्यासाठी मास्क वापरण्याचे नागरिकांना आवाहन श्री. देसाई यांनी यावेळी केले.
महानगरपालिकेच्या स्मार्ट बसच्या लोकार्पण प्रसंगी प्रवाशांना गुलाबपुष्प देवून व हवेत फुगे सोडून करण्यात आले. याप्रसंगी खासदार इम्तीयाज जलिल, आ. अंबादास दानवे, आ. संजय शिरसाट, माजी खा. चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, विनोद घोसाळकर, रेणुकादास वैद्य, महानगरपालिकेचे आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच मान्यवराचे स्वागत आस्तिककुमार पांडेय यांनी केले. याप्रसंगी महानगर पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
घाटीत स्व.माँ साहेब मीनाताई ठाकरे कक्षाचे लोकार्पण

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) जनतेच्या सेवेसाठी आमदार अंबादास दानवे यांच्या निधीतून रुग्णांसाठी उपचाराकरिता सुसज्ज व सर्व सोयीसुविधा असलेला स्वतंत्र असा स्व.माँ साहेब मीनाताई ठाकरे कक्ष स्थापन करण्यात आला आहे, या कक्षाच्या माध्यमातून रुग्ण ठणठणीत बरा होऊन घरी परतेल, असे मत व्यक्त करत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी घाटी प्रशासनास शुभेच्छा दिल्या.
घाटीत मेडिसिन विभागात स्व. माँ साहेब मीनाताई ठाकरे कक्षाच्या कोनशिलेचे अनावरण श्री.देसाई यांच्याहस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. यावेळी सर्वश्री आमदार अंबादास दानवे, संजय शिरसाट, विनोद घोसाळकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे, नंदकुमार घोडेले, घाटीच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर, कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ.अरविंद गायकवाड आदी उपस्थित होते.

कोनशिलेचे अनावरण झाल्यानंतर श्री. देसाई यांनी फीत कापून व दीप प्रज्वलन करून कक्षाचे उदघाटन केले व कक्षाची माहिती जाणून घेतली. यावेळी कक्षाबाबत संपूर्ण माहिती अधिष्ठाता डॉ. येळीकर यांनी दिली, तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले.