इफ्फीः इटालियन सिनेमॅटोग्राफर व्हिट॒टोरिओ स्टोरारो यांना प्रतिष्ठेच्या जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार

उद्या उद्घाटन सोहळा

पणजी , दि. १५ : 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फीः) उद्या (16 जानेवारी, 2021) होणार्‍या उद्घाटन समारंभात इटालियन सिनेमॅटोग्राफर व्हिटोरिओ स्टोरारो यांना प्रतिष्ठेच्या जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

‘द बर्ड विथ द क्रिस्टल प्लमेज’ (1970) या चित्रपटामुळे ते लोकप्रिय झाले. द कन्फर्मिस्ट (1970), लास्ट टँगो इन पॅरिस (1972), 1900 (1976), अपोकॅलिप्स नाऊ (1979), रेड्स (1981), द लास्ट एम्परर (1987), डिक ट्रेसी (1990 ), कॅफे सोसायटी (2016) आणि वंडर व्हील (2017) यासारख्या चित्रपटांसाठी ते प्रसिद्ध आहेत.

स्टोरारो यांना अ‍ॅपोकॅलिप्स नाऊ (1979), रेड्स (1981) आणि द लास्ट एम्परर (1987) या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीसाठी तीन ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत आणि तीन वेळा हा पुरस्कार जिंकलेल्या तीन हयात व्यक्तींपैकी ते एक आहेत .  

15 दर्जेदार चित्रपटांमध्ये सुवर्ण मयुर  पुरस्कारासाठी साठी चुरस   

51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्याची राजधानी पणजी येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम या  गोव्याच्या सोनेरी किनाऱ्यावर  उद्या (16 जानेवारी 2021) दिमाखात सुरु होणार आहे. .सध्याच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर  प्रथमच इफ्फीचे आयोजन संमिश्र स्वरूपात होणार आहे. यंदा हा महोत्सव ,  आपापल्या घरातून  चित्रपट आणि इतर कार्यक्रमात आभासी पद्धतीने सहभागी होण्याचा आणि पाहण्याचा प्रतिनिधींना पर्याय असेल. आशियातील सर्वात जुना आणि भारतातील सर्वात मोठ्या या चित्रपट महोत्सवात जगभरातील एकूण 224 चित्रपट दाखवले जाणार आहेत.  उद्घाटन समारंभात इटालियन सिनेमॅटोग्राफर  व्हिटोरिओ स्टोरारो यांना प्रतिष्ठेच्या जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार  आहे.

या कार्यक्रमाला  केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित राहतील.

कलाकारांची मांदियाळी असलेल्या या कार्यक्रमात चित्रपट दिग्दर्शक पाब्लो सेसर (अर्जेंटिना), प्रसन्ना विठानगे (श्रीलंका), अबू बकर शौकी (ऑस्ट्रिया), प्रियदर्शन (भारत) आणि रुबैयात हुसेन (बांगलादेश) उपस्थित राहणार असून ते या महोत्सवातील ज्युरी अर्थात   परीक्षक सदस्य देखील असतील.

यावर्षीच्या ‘कंट्री ऑफ फोकस’ असलेल्या बांगलादेशातील प्रतिनिधी देखील उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहतील. कंट्री ऑफ फोकस’  हा एक विशेष विभाग आहे  ज्यात त्या देशातील सिनेमॅटिक उत्कृष्टता आणि योगदानाची ओळख करून देणारे चित्रपट दाखवले जातात.

यावेळी एनएफडीसी फिल्म बाजारचे देखील आभासी उद्घाटन केले जाईल.

दरवर्षी  गोवा राज्यात आयोजित होत असलेल्या या महोत्सवाचे उद्दीष्ट जगाभरातील चित्रपटाना, त्यांचे चित्रपटाच्या कलेतील उत्कृष्टतेचे प्रदर्शन घडवण्यासाठी एक सामायिक व्यासपीठ उपलब्ध करुन देणे ; विविध राष्ट्रांच्या चित्रपट संस्कृती तसेच त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा  समजून घेणे आणि त्याचा आस्वाद घेणे हा उद्देश असून जगातील हा महोत्सव लोकांमध्ये मैत्री आणि सहकार्याला प्रोत्साहन देतो. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील चित्रपट महोत्सव संचालनालय आणि गोवा राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित केला जातो.

51 व्या इफ्फीच्या भारतीय पॅनोरामा विभागात निवडक 23 फिचर आणि 20 नॉन-फीचर चित्रपट दाखवले जातील.  गोवन चित्रपट एका खास गोवन विभागा अंतर्गत प्रदर्शित केले जातील. या व्यतिरिक्त,  इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात  15 प्रशंसा प्राप्त चित्रपट सुवर्ण मयुर  पुरस्कारासाठी स्पर्धा करतील.

उद्या दुपारी 3.वाजता सुरू होणारा हा कार्यक्रम डीडी इंडिया आणि डीडी नॅशनल वाहिन्यांवर  प्रसारित केला जाईल आणि पीआयबीच्या यूट्यूब चॅनल youtube.com/pibindia वर थेट प्रक्षेपित होईल.