ग्रामपंचायत मतदानासाठी मतदारांना सुट्टी अथवा सवलत

औरंगाबाद दि. 14 :-  औरंगाबाद जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (ग्रामपंचायत) सार्वजनिक निवडणुकांसाठी दि. 15 जानेवारी 2021 रोजी होत आहे. मतदानाच्या दिवशी मतदान करता यावे यासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याचा निर्णय उद्योग, उर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्यामार्फत घेण्यात आला असल्याचे कामगार उपायुक्त औरंगाबाद विभाग, औरंगाबाद यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

निवडणूक होत असलेल्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर किमान दोन तासांची  सवलत देण्यात यावी. मात्र त्याबाबत त्यांनी संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.

निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, रिटेलर्स इ. येथील कामगारांना ही सुटी किंवा सवलत लागू राहील.

            उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी, व्यवस्थापनाने दिलेल्या सूचनांची योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारास योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास   याप्रकरणी संबंधितांविरुद्ध आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, तसेच कामगार उपायुक्त कार्यालय औरंगाबाद येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून संबंधितांनी दूरध्वनी क्रमांक 0240-2334603 वर संपर्क साधावा असे आवाहन कामगार उप आयुक्त, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.