केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात झालेली चर्चेची आठवी फेरी निष्फळ 

चर्चेची पुढची फेरी 15 जानेवारीला होणार

नवी दिल्ली, 8 जानेवारी 2021

केंद्र सरकार आणि 41  शेतकरी संघटनाचे प्रतिनिधी यांच्यात आज नवी दिल्लीत विज्ञान भवन इथे चर्चेची आठवी फेरी झाली. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर,रेल्वे, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्य मंत्री सोम प्रकाश या चर्चेत सहभागी झाले. कृषी कायद्याबाबत सुचवण्यात आलेल्या सुधारणांबाबत मुद्देनिहाय चर्चेचे आवाहन त्यांनी पुन्हा एकदा  केले. 

देशातल्या शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कृषी कायदे करण्यात आल्याचे तोमर यांनी सांगितले. सरकारला शेतकऱ्यांची चिंता असून हे आंदोलन समाप्त व्हावे अशी सरकारची इच्छा आहे मात्र सरकारने सुचवल्यानुसार पर्यायांवर चर्चा होत नसल्याने तोडगा निघत नसल्याचे  ते म्हणाले.  

शेतकरी संघटनांनी आंदोलन शिस्तबद्ध ठेवल्याबद्दल कृषी मंत्र्यांनी प्रशंसा केली. खुल्या मनाने चर्चा सुरु ठेवण्याची सरकारची इच्छा असून बोलणी सुरु राहिल्यास तर्कशुद्ध मार्गाने तोडगा शक्य असल्याचे ते म्हणाले. 

शेतकरी संघटनानी कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे तर सरकारने सुधारणा पुन्हा सुचवल्या आहेत. प्रदीर्घ चर्चेनंतरही तोडगा निघाला नसल्यामुळे चर्चेची पुढची फेरी येत्या 15 तारखेला घेण्याचा निर्णय घेण्यात आला.