नांदेड:कोविड-19 लसीकरणाची रंगीत तालीम

Image may contain: 3 people, people standing and indoor, text that says 'STOP'

नांदेडदि. 8 – प्रस्तावित कोविड-19 लसीकरणाच्या यशस्वीतेसाठी रंगीत तालीम आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या उपस्थितीत मनपा शेजारील आरोग्य विभागाच्या इमारतीत झाली.

यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, डॉ. एस.बी.शिरसीकर, मनपाचे डॉ. बदीयोद्दीन, वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम शिलेदार तसेच कोवीड-19 व्हॅक्सीनेशन पार पाडणारे वैद्यकीय कर्मचारी व अधिपरीचारिका यांची उपस्थिती होती.

कोविड-19 लसीकरणासाठी शासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य खबरदारीच्या उपाययोजना घेतलेल्या आहेत. यात प्रामुख्याने ज्या व्यक्तीला लस देण्यासाठी निमंत्रित केले आहे. त्या व्यक्तींची ओळखपत्रासह द्विस्तरीय खात्री करुन घेणे. यात प्रामुख्याने प्रवेश करतेवेळी पोलीस अथवा सुरक्षा कर्मचारी पूर्ण तपासणी करुन घेईल. त्यानंतरच संबंधित व्यक्तीला लसीकरणासाठी आत सोडले जाईल. लसीकरण केंद्रात प्रवेश दिल्यानंतर लस देण्याअगोदर पून्हा लस घेणाऱ्या व्यक्तीची ओळखपत्र तपासून खात्री करुन घेतल्या जाईल. याचबरोबर ऑनलाईन नोंदणीही केली जाईल. संपूर्ण मोहिमेमध्ये पावलोपावली दक्षता घेण्याचे निर्देश शासनाने निर्गमित केले आहेत. आजच्या या रंगीत तालमीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांच्या समक्ष खात्री करुन घेतली.

या मोहिमेमध्ये प्राथमिकस्तरावर जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेत कार्यरत असलेल्या 17 हजार 99 लाभधारकांना पहिल्या फेरीत लसीकरण करण्याचे नियोजन झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी सर्व विभागाची पाहणी केली. तत्पुर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी बाह्यरुग्ण तपासणी विभाग, नावनोंदणी विभाग व ज्याठिकाणाहून रुग्णांना औषधे दिली जातात, त्या औषध वितरण विभागास कार्यरत कर्मचाऱ्यांशी व रुग्णांशी चौकशी करुन पाहणी केली.