कोव्हीड-19 च्या लसीकरणासाठी जिल्हा प्रशासन पूर्ण सज्ज – जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर

परभणी, दि.8 :- प्रस्तावित कोव्हीड-19 च्या लसीकरणासाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या सुविधा अपेक्षित आहेत त्या सर्व सुविधा उपलब्ध असून आम्ही ही मोहीम यशस्वीपणे राबवू असा विश्वास जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी व्यक्त केला.

Image may contain: 1 person, standing

या लसीकरणाची रंगीत तालीम आज यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा रुग्णालय येथे घेण्यात आली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे, डॉ. प्रकाश डाके, डॉ. गणेश शिरसुलवार डॉ. किशोर सुरवसे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर म्हणाले की, प्राथमिक स्तरावर ही लस उपलब्ध झाल्यानंतर ज्या व्यक्तींना द्यावयाची आहे त्याचे वर्गीकरण संपूर्ण नावासह यादी आरोग्य विभागाकडे तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. टप्प्याटप्प्याने ही मोहीम सर्व संबंधितांपर्यंत पोहोचवून यशस्वी केली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कोविड-19 लसीकरणासाठी शासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य खबरदारीच्या उपाययोजना घेतलेल्या आहेत. यात प्रामुख्याने ज्या व्यक्तीला लस देण्यासाठी निमंत्रित केले आहे. त्या व्यक्तींची ओळखपत्रासह द्विस्तरीय खात्री करुन घेणे. यात प्रामुख्याने प्रवेश करतेवेळी पोलीस अथवा सुरक्षा कर्मचारी पूर्ण तपासणी करुन घेईल. त्यानंतरच संबंधित व्यक्तीला लसीकरणासाठी आत सोडले जाईल. लसीकरण केंद्रात प्रवेश दिल्यानंतर लस देण्याअगोदर पून्हा लस घेणाऱ्या व्यक्तीची ओळखपत्र तपासून खात्री करुन घेतल्या जाईल. याचबरोबर ऑनलाईन नोंदणीही केली जाईल. संपूर्ण मोहिमेमध्ये पावलोपावली दक्षता घेण्याचे निर्देश शासनाने निर्गमित केले आहेत. या मोहिमेमध्ये प्राथमिकस्तरावर जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेत कार्यरत असलेल्या सर्व लाभधारकांना पहिल्या फेरीत लसीकरण करण्याचे नियोजन झाले आहे. लसीकरण केंद्रावर तीन कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रतिक्षालय, लसीकरण कक्ष व निरीक्षण कक्षाचा समावेश होता.