पोलीस भरतीचा वादग्रस्त जीआर अखेर रद्द

पोलीस शिपाई भरती २०१९ : गृह विभागाकडून ४ जानेवारीचा शासन निर्णय रद्द
एसईबीसी उमेदवारांना दिलासा

मुंबई, दि. 7 : महाविकास आघाडी सरकारने विरोधानंतर पोलीस भरतीचा वादग्रस्त जीआर  ( police recruitment GR) अखेर रद्द केला आहे. मराठा संघटनांच्या विरोधानंतर राज्य सरकारवर जीआर मागे घेण्याची नामुष्की ओढवली आहे. 

राज्यात पोलीस भरती 2019 करिता एसईबीसी (SEBC) च्या ज्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत, त्यांना मोठा दिलासा देण्यात येत असून गृह विभागाकडून दि. 4 जानेवारी 2021 रोजी निर्गमित केलेला शासन निर्णय रद्द करण्यात येत आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

पोलीस शिपाई भरती 2019 करीता ज्या एसईबीसी (SEBC) उमेदवारांनी अर्ज केले होते, त्यांना शासनाच्या सा.प्र.वि. कडील दि. 23 डिसेंबर 2020 च्या शासन निर्णयाचा लाभ देण्याच्या दृष्टीकोनातून सुधारित शासन निर्णय गृह विभागाकडून लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.