पुणे शहर व जिल्ह्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडून आढावा

मुंबई, दि. ४ :-  ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनाची संवाद साधून जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

चक्रीवादळाच्या संकटकाळात मदतकार्यात सहभागी झालेले लाईफ गार्ड, पोलीस, संरक्षण दलांचे, एनडीआरएफचे जवान, स्थानिक स्वराज संस्थांचे कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, आपत्कालिन यंत्रणेतील, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, नागरिकांचे उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर आभार मानले आहेत. पुणे शहरात तसेच मावळ, आंबेगाव, जुन्नर, खेड, वेल्हे, मुळशीसह इतर तालुक्यातही वादळानं मोठे नुकसान केले आहे. घरं, शाळा, अंगणवाड्या, गुरांचे गोठे, भाजीपाल्याची पिके, फळबागांचं झालेलं नुकसान प्रचंड आहे. पोल्ट्री शेड, कांदा चाळी, पॉली हाऊसचे पत्रे उडून गेल्याचे प्रकार घडले आहेत. विजेच्या तारा व खांब मोडून पडल्यानं वीजयंत्रणेचंही नुकसान झालं आहे. पुणे जिल्ह्यात आणखी एक-दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील लोकप्रतिनिधींशी संवाद साधून सद्यपरिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासकीय अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा करुन नुकसानीबद्दलची माहिती जाणून घेतली. पंचनामे पूर्ण होऊन अहवाल येताच मदतीबद्दल निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *