राज्यात चारही जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा ड्राय रन यशस्वी

लसीकरणासाठी राज्य शासन सर्वोतोपरी सज्ज- आरोग्यमंत्री

राज्यात चारही जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा ड्राय रन यशस्वी

जालना/मुंबई, दि. २ : कोरोना लसीकरणासाठी आज राज्यातील पुणे, नागपूर, जालना आणि नंदूरबार या चार जिल्ह्यांमध्ये ड्राय रन यशस्वीरित्या घेण्यात आला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते जालना येथे ड्राय रनच्या सत्राचे उद्घाटन करण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यात तीन ठिकाणी लसीकरणाचे ड्राय रन घेण्यात आले.

राज्यस्तरावरुन या ड्राय रनचे संनियंत्रण आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी, संचालक डॉ अर्चना पाटील यांनी केले.पुणे जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय औंध, प्राथमिक आरोग्य केंद्र माण, पिंपरी चिंचवड महापालिकेतील जिजामाता आरोग्य केंद्र, नंदूरबार जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय नंदूरबार, प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टी आणि उपजिल्हा रुग्णालय नवापूर तर जालना जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय अंबड, प्राथमिक आरोग्य केंद्र शेळगाव, नागपूर जिल्ह्यात डागा मेमोरियल हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय कामठी आणि नागपूर महापालिकेतील के.टी.नगरचे शहरी आरोग्य केंद्र याठिकाणी ड्राय रन घेण्यात आला. या चारही जिल्ह्यांमध्ये व महानगरपालिकेत सत्र स्थळी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक व मनपा आरोग्य अधिकारी यांनी भेटी देऊन संनियंत्रण केले.

या ड्राय रनमध्ये सत्र स्थळावर चाचणी लाभार्थ्यांचे निरीक्षण करणे. २५ लाभार्थ्यांचे लसीकरण करणे याकामांसोबतच लसीकरण अधिकारी एक यांनी लाभार्थ्यांना त्यांच्या कोवीन अॅपवरील नोंदणीनुसार कक्षात सोडले. त्यानंतर लसीकरण अधिकारी दोन यांनी कोवीन अॅप्लीकेशनमध्ये लाभार्थ्यांच्या माहितीची पडताळणी केली. त्यानंतर लसीकरणाची माहितीची नोंद कोवीन ॲपमध्ये करण्यात आली. गर्दीचे व्यवस्थापन, लाभार्थ्यांशी वैयक्तिक संवाद साधणे, आरोग्य सेविकेला मदत करणे, लसीकरण झाल्यानंतर ३० मिनिटे लाभार्थ्यांना थांबण्यास सांगणे इ. गोष्टी लसीकरण अधिकारी तीन व चार यांनी केले.

कोरोना लसीकरण सत्र आयोजित करताना हात धुण्याची व्यवस्था, सॅनिटायझरची उपलब्धता करण्यात आली. सर्वांनी मास्क वापरणे आणि योग्य ते अंतर (Social Distancing) राखणे या नियमांची अंमजबजावणी करण्यात आली.

सर्व सत्रांच्या ठिकाणी लसीचे दुष्परिणामांवरील उपचाराचे औषधाचे साहित्य ठेवण्यात आली होती.

ड्राय रनचे उद्दिष्ट

  • क्षेत्रियस्तरावर कोवीन अॅप किती सोईस्कर व उपयोगी आहे हे तपासणे.
  • कोरोना लसीकरणाबतचे नियोजन, अंमलबजावणी तसेच अहवाल तयार करणे, या सर्व बाबींची पडताळणी/ तपासणी.
  • प्रत्यक्ष लसीकरण सुरु करण्यापूर्वी, लसीकरणाबाबतची आव्हाने व त्यानुसार मार्गदर्शक सुचना तयार करणे
  • लसीकरण मोहिमेतील सर्वस्तरावरील अधिकारी तसेच कर्मचारी यांचा आत्मविश्वास वाढविणे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा ड्रायरन

Image may contain: 2 people, people standing and indoor

कोरोना लसीकरणाचा ड्राय रन आज संपूर्ण देशात घेण्यात आला. महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा त्यासाठी समावेश करण्यात आला. त्यापैकी एक असलेल्या जालना जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात झालेल्या ड्रायरनची पाहणी राज्याचे आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री राजेश टोपे यांनी केली. लस तयार करणाऱ्या एकूण आठ कंपन्यांपैकी दोन कंपन्यांनी तिसरा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला असून लसीकरणाला केंद्र शासनाने परवानगी दिल्यास प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात करण्यात येईल. लसीकरणासाठी राज्य शासन सर्वोतोपरी सज्ज असल्याचेही श्री. टोपे यांनी यावेळी सांगितले.

Image may contain: 3 people

यावेळी आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी सांगितले की, लसीकरणाच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन होते का, तसेच लसीकरणामध्ये येणाऱ्या अडचणी, संभाव्य चुकांची प्रत्यक्ष लसीकरणाच्या वेळी पुनरावृत्ती होऊ नये यासाठी हा ड्रायरन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.श्री. टोपे म्हणाले, कोरोनाच्या लसीकरणासाठी मतदान केंद्राप्रमाणे बुथची स्थापना करण्यात येणार आहे. या लसीकरण केंद्रावर तीन कक्ष असतील. पहिल्या कक्षात लसीकरणासाठी येणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवली जाईल तर दुसऱ्या कक्षात त्या व्यक्तीला लस टोचण्यात येईल. तिसऱ्या कक्षामध्ये लस दिलेल्या व्यक्तीला निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.जालना जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय जालना, उपजिल्हा रुग्णालय अंबड, बदनापूर तालुक्यातील शेलगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथेही ड्रायरन घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख, जागतिक आरोग्य संघटनेचे सय्यद मुजिब, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, डॉ. प्रताप घोडके,डॉ. संजय जगताप, डॉक्टर्स, परिचारीका आदींची उपस्थिती होती. ड्रायरनसाठी 25 आरोग्य कर्मचा-यांना सहभागी करण्यात आले.