भारतातील सक्रिय रुग्णसंख्येत सातत्याने घसरण सुरू

सक्रिय रुग्णसंख्या 179 दिवसानंतर 2.54 लाखांवर
गेल्या 7 दिवसांपासून दररोज 300 पेक्षा कमी मृत्यूची नोंद

नवी दिल्ली, 1 जानेवारी 2021

भारतातील सक्रिय रुग्णसंख्येत सातत्याने घसरण सुरू आहे. सक्रिय रुग्णसंख्या आज 2.54 लाखांपर्यंत खाली आली आहे. गेल्या 179 दिवसातील हा नीचांक आहे. 6 जुलै 2020 रोजी एकूण सक्रिय रुग्णसंख्या 2,53,287 इतकी होती.

भारताची सध्याची सक्रिय रुग्णसंख्या देशाच्या एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 2.47% आहे.देशात दैनंदिन नवीन रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात 20 हजाराच्या आसपास राहिली आहे. गेल्या 24 तासात नवीन रुग्णसंख्या 20,035 इतकी नोंदली गेली तर 23,181 रुग्ण गेल्या 24 तासात बरे झाले आहेत. गेल्या 35 दिवसात बरे झालेल्या रुग्णांची संख्या नवीन रुग्णसंख्येपेक्षा जास्त राहिल्यामुळे सक्रिय रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे.

एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 99 लाखापर्यंत पोहचली आहे. बरे झाले रूग्ण आणि सक्रिय रुग्ण यामधील तफावत वाढत असून आता त्याने 96 लाखांचा आकडा पार केला असून ती 96,29,207 इतकी झाली आहे.नवीन बरे झालेले रुग्ण आणि नवीन रुग्णसंख्या यातील तफावत वाढत असून त्यामुळे रुग्ण बरे होण्याच्या दरातही सुधारणा होऊन तो आज 96.8 टक्के इतका झाला आहे.नवीन बरे झालेल्या रुग्णांपैकी 77.61% रुग्ण 10 राज्य/केंद्रशासित प्रदेशातील आहे.केरळ मध्ये एका दिवसातील सर्वाधिक बरे झालेल्या रुग्णांची नोंद झाली असून 5376 नवीन रुग्ण बरे झाले आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्रात 3612 तर पश्चिम बंगाल मध्ये 1537 रुग्ण बरे झाले आहेत.

नवीन रुग्णांपैकी 80.19% रुग्ण 10 राज्य/केंद्रशासित प्रदेशातील आहेत.केरळमध्ये 5215 इतक्या सर्वाधिक दैनंदिन नवीन रुग्णांची नोंद झाली आहे  त्याखालोखाल महाराष्ट्रात 3509 नवीन रुग्ण आढळले आहेत.गेल्या 24 तासात 256  मृत्यूची नोंद झाली आहे. 80.47% मृत्यू दहा राज्य/केंद्रशासित प्रदेशातील आहेत.महाराष्ट्रात सर्वाधिक 58 मृत्यूंची नोंद झाली केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये अनुक्रमे 30 आणि 29 मृत्यूंची नोंद झाली.गेल्या सात दिवसांपासून दैनंदिन मृत्यूची संख्या 300 पेक्षा कमी आहे. यामुळे मृत्युदर कमी राहिला असून सध्या तो 1.45 आहे.देशातील एकूण मृत्यूंपैकी 63 टक्के मृत्यू हे महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि दिल्ली या पाच राज्यातील आहेत.