सुनीत शर्मा यांनी रेल्वे बोर्डाचे नवे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला

नवी दिल्ली, 1 जानेवारी 2021

सुनीत शर्मा यांनी रेल्वे बोर्डाचे (रेल्वे मंत्रालय) नवे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आणि केंद्र सरकारचे पदसिद्ध प्रधान सचिव म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. सुनीत शर्मा यांची रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करायला मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मान्यता दिली आहे. यापूर्वी सुनीत शर्मा हे पूर्व रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून काम करत होते.

सुनीत शर्मा हे  1979 मध्ये आयआयटी कानपूरमध्ये अभियांत्रिकीचा अभ्यास करत असताना विशेष श्रेणीतील प्रशिक्षणार्थी म्हणून भारतीय रेल्वेमध्ये रुजू झाले. मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील पदवीधर असलेल्या शर्मा यांनी भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांवर 40 वर्षांहून अधिक काळ काम केले आहे. त्यांनी ऑपरेशनल वर्किंग, शेड्स, डेपो आणि वर्कशॉप्समध्ये देखभाल दुरुस्ती विभागातही काम केले. ते मुंबईतील परळ वर्कशॉपचे मुख्य व्यवस्थापक होते, जिथे डोंगराळ रेल्वेसाठी नॅरो गेज लोकोमोटिव्ह तयार करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. त्यांनी मुंबई जवळील माथेरानच्या रेल्वेसाठी जुन्या स्टीम नॅरो गेज लोकोमोटिव्ह पुन्हा सुरु केली.  2006 च्या मुंबई उपनगरीय रेल्वेतील बॉम्बस्फोटावेळी, दहशतवादी हल्ल्यानंतर काही तासात उपनगरीय सेवा पूर्ववत करणाऱ्या चमूचा ते भाग होते. मुंबई सीएसटीचे एडीआरएम, म्हणून, मुंबईची जीवनरेखा मानल्या जाणाऱ्या उपनगरीय रेल्वेच्या सेवा वाढवण्याचे श्रेय त्यांना जाते. 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांदरम्यान, मध्य रेल्वेच्या मुंबई सीएसटी येथे झालेल्या हल्ल्यानंतर परिस्थिती पूर्ववत करणाऱ्या चमूचे ते सदस्य होते. पुणे डीआरएम म्हणून त्यांनी पायाभूत सुविधा जोडण्यात मोलाचे काम केले ज्यामुळे परिचालन क्षमता वाढली. डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स वाराणसीमध्ये मेकॅनिकल इंजिनिअर असताना इलेक्ट्रिक इंजिन उत्पादन सुरू करण्यासाठी त्यांनी नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली डिझेलचे इलेक्ट्रिक इंजिनमध्ये रुपांतर विक्रमी वेळेत आणि जगात प्रथमच झाले.  

रायबरेली मॉडर्न कोच फॅक्टरीचे महाव्यवस्थापक म्हणून त्यांनी एका वर्षात आवश्यक आधुनिक प्रवासी डब्यांचे उत्पादन दुपटीने वाढवून  विक्रम केला.

ईस्टर्न रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून त्यांनी मालगाड्यांची गती विक्रमी पातळीवर वाढवण्यासाठी आणि नवीन मार्गाचे विद्युतीकरणाचे अनेक पायाभूत प्रकल्प आणि विद्युतीकरण पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला ज्यामुळे केवळ परिचालन कार्यक्षमताच वाढली नाही तर स्थानिक क्षेत्राचाही विकास झाला. कामकाजाच्या सुलभतेसाठी आणि प्रशासकीय सुधारणांसाठी प्रणालीत बदल घडवून आणण्यासाठी ते प्रख्यात आहेत.

कारकीर्दीत त्यांनी अनेक व्यावसायिक पुरस्कार पटकावले आहेत. (मॉडर्न कोच फॅक्टरी रायबरेली) आणि मुख्य मेकॅनिकल इंजिनिअर (बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स) च्या महाव्यवस्थापकपदी असताना कारखान्याने सर्वोत्कृष्ट उत्पादन युनिटचा  पुरस्कार जिंकला.

सुनीत शर्मा यांनी जर्मनी आणि फ्रान्समध्ये व्यावसायिक प्रशिक्षण घेतले आहे आणि अमेरिकेतील कार्नेगी मेलॉन विद्यापीठात त्यांनी प्रगत नेतृत्व व व्यवस्थापन अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यांनी इंजिनच्या निर्मितीसाठी सल्लागार म्हणून इराणला भेट दिली आहे.

त्यांना खेळात रुची असून बिलियर्ड्स आणि स्नूकर स्पर्धात्मक स्तरावर खेळले आहेत. ते गोल्फर आणि बॅडमिंटन व स्क्वॅश खेळाडू देखील आहेत.