भारताने जिंकली ‘बॉक्सिंग-डे कसोटी’ ,मराठमोळ्या रहाणेचा बहुमान

मेलबर्न, 
पहिल्या कसोटीत ३६ धावांत गारद होण्याचा लागलेला ठपका, कर्णधार विराट कोहलीचे मायदेशी परतणे, मोहम्मद शमीपाठोपाठ आता उमेश यादवचेही दुखापतीमुळे बाहेर होणे, अशा प्रतिकूल परिस्थितीतही अजिंक्य  रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मेलबर्न क्रिकेट मैदानावर चौथ्याच दिवशी ‘बॉक्सिंग-डे’ दुसरा कसोटी क्रिकेट सामना ८ गड्यांनी जिंकला.अजिंक्य रहाणे सामन्याचा मानकरी ठरला असून भारताने चार सामन्यांच्या या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळविली आहे.

पहिल्या डावात शतकी खेळी करणाऱ्या अजिंक्य रहाणेने दुसऱ्या डावातही ७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विजयी फटका लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.महत्वाची गोष्ट म्हणजे विराट कोहली, मोहम्मद शमी यासारख्या महत्वाच्या खेळाडूंनी माघार घेतल्यानंतरही अजिंक्यने संयमी नेतृत्व करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. या निमीत्ताने अजिंक्यने धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या तीन सामन्यांत नेतृत्व करुन संघाला विजय मिळवून देणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत आता अजिंक्यचं नाव घेतलं जाईल. याआधी धोनीने कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या ४ कसोटी सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिला आहे.

रहाणेनेच भारतासाठी विजयी खेळी केली. रहाणेचा हा कर्णधार म्हणून तीन कसोटी सामन्यांतील हा तिसरा विजय आहे. क्वचितच एखादा संघ इतक्या कमी कालावधीत खालच्या पातळीवरून इतकी जोरदार मुसंडी मारू शकतो.

Image


 
तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियन संघाने ६ बाद १३३ पर्यंत मजल मारत दोन धावांची आघाडी मिळवली होती. कॅमरुन ग्रीन आणि पॅट कमिन्स या जोडीने भारतीय गोलंदाजांना सुरुवातीच्या सत्रात चांगलंच झुंजवलं. अखेरीस कमिन्सला बाद करत बुमराहने भारताला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर ठराविक अंतराने कॅमरुन ग्रीनही मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ४५ धावांची खेळी केली. सातव्या विकेटसाठी ग्रीन आणि कमिन्स यांच्यातील ५७ धावांच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. यानंतर नॅथन लियॉनही सिराजच्या गोलंदाजीवर स्वस्तात माघारी परतला. जोश हेजलवूड आणि मिचेल स्टार्क जोडीने भारतीय गोलंदाजांना अखेरपर्यंत झुंजवत संघाला द्विशतकी टप्पा गाठून दिला. अखेरीस आश्विनने जोश हेजलवूडचा त्रिफळा उडवत कांगारुंचा दुसरा डाव २०० धावांवर संपवला. दुसऱ्या डावात भारताकडून मोहम्मद सिराजने ३, बुमराह-आश्विन आणि जाडेजा या अनुभवी त्रिकुटाने प्रत्येकी २-२ तर उमेश यादवने १ बळी घेतला.

Image


 
ऑस्ट्रेलियाला केवळ ६९ धावांची आघाडी मिळविता आली. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी ७० धावांचे सोपे आव्हान राहिले. विजयासाठी धावांचा पाठलाग करताना सलामी फलदाज मयंक अग्रवाल व कसोटीचा तज्ज्ञ खेळाडू चेतेश्वर पुजारा पुन्हा एकदा अपयशी ठरला. मात्र कसोटी पदार्पण करणाऱ्या शुभमन गिलने आपल्या फलंदाजीची चमक दाखवित कर्णधार रहाणेसोबत नाबाद खेळी करीत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. शुभमनने ३६ चेंडूत ७ चौकारांसह नाबाद ३५ धावांचे, तर अqजक्यने ४० चेंडूत ३ चौकारांसह नाबाद २७ धावांचे योगदान दिले.

Image

अजिंक्यच्या या शतकी खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यानिमीत्ताने त्याला मानाचं Johnny Mullagh Medal देण्यात आलं. २०१९ साली क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बॉक्सिंग डे कसोटीत सामनावीराचा पुरस्कार मिळणाऱ्या खेळाडूला माजी क्रिकेटपटू Johnny Mullagh यांच्या सन्मानार्थ मेडल देऊन गौरवण्याचा निर्णय घेतला. यानंतर मराठमोळ्या अजिंक्यने हे मानाचं मेडल पटकावत भारताचं नाव मोठं केलं आहे.