आकाश, तुझा आम्हाला अभिमान आहे’,मुंबईत घडले ‘देवदूता’चे दर्शन!

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून पोलीस हवालदार आकाश गायकवाड यांचे अभिनंदन

चक्रीवादळ आणि कोरोनाच्या संकटात मुंबईत घडले ‘देवदूता’चे दर्शन!

मुंबई, दि.४: कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे आधीच विरळ झालेले मुंबईतील रस्ते कालच्या चक्रीवादळामुळे अगदी निर्मनुष्य झाले होते. या पार्श्वभूमीवर मुंबईत एका ‘देवदूता’चे दर्शन घडले. जनतेच्या रक्षणासाठी नेहमीच अग्रेसर असणाऱ्या पोलीस दलातील हवालदार आकाश गायकवाड यांनी ऐन गरजेच्या वेळी रक्तदान करून एका लहान मुलीला जीवदान दिले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांना याची माहिती मिळताच त्यांनी हवालदार गायकवाड यांना दूरध्वनी करून ‘आकाश तुझा आम्हाला अभिमान आहे’, अशा शब्दांत त्याचे अभिनंदन केले. श्री. गायकवाड यांच्यासारख्या योद्ध्यांना माझा सलाम! पोलीस कुटुंबाचा प्रमुख म्हणून मला आपल्या पोलीस दलाचा अभिमान आहे, असे भावोद्गारही त्यांनी यावेळी काढले.

हिंदुजा रुग्णालयात बुधवारी (दि.३) सना फातिम खान या १४ वर्षाच्या छोट्या मुलीवर हृदयशस्त्रक्रिया सुरू होती. तिच्यासाठी ‘ए पॉझिटिव्ह’ रक्ताची तातडीने गरज होती. आई आणि वडिलांचा रक्तगट जुळत नव्हता. त्यामुळे संभाव्य सर्व ठिकाणी रक्ताची शोधाशोध सुरू झाली. मुंबईमध्ये निसर्ग चक्रीवादळ व कोरोनामुळे रक्त देण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या योग्य असे कोणीही रुग्णालयात येऊ शकले नाही, अशा गंभीर परिस्थितीत दवाखान्यात नेमणुकीस असलेले ताडदेव पोलीस ठाण्याचे ऑन ड्युटी पोलीस हवालदार आकाश बाबासाहेब गायकवाड स्वत:हून पुढे सरसावले. पोलीस ब्रीदवाक्यास अनुसरून त्यांनी रक्तदान केले आणि या मुलीला जीवनदान मिळाले. स्वप्नवत घडणाऱ्या या घटनेतून माणुसकी हाच धर्म श्रेष्ठ असल्याची प्रचिती रुग्णालयातील उपस्थितांना आली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हवालदार आकाश गायकवाड यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *