सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलचे घाटीला 31 डिसेंबर पर्यंत हस्तांतरण करा -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

Image may contain: 1 person, sitting and indoor

औरंगाबाद, दिनांक 28 : शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय परिसरातील (घाटी) 68 कोटी रुपयांच्या 250 खाटांचे सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील हेल्थ सर्विसेस कन्स्लटन्सी कार्पोरेशनने (एचएससीसी) 31 डिसेंबर 2020 पूर्वी घाटी प्रशासनास हस्तांतरित करावे. तत्पूर्वी इमारतीतील सर्व सोयी सुविधा पूर्ण करून द्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत श्री. चव्हाण बोलत होते. या बैठकीस घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. सुधीर चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एस. भगत, एचएससीसीचे राजकुमार शर्मा, उपअभियंता कदीर अहमद, सहायक अभियंता श्री. सय्यद, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. नंदनवनकर, प्र.उप अभियंता एस.बी. डोंगरे, ए.बी. काळे आदींची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले, सन 2016 बांधकामास सुरुवात करण्यात आलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलचे बांधकाम 2018 अखेर पूर्ण झाले. सदरील इमारतीत आवश्यक असणाऱ्या साधनसुविधा योग्य प्रमाणात व दर्जेदार असाव्यात. याबाबींची तपासणी सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी. तद्नंतर एचएससीसीने हस्तांतरणाची प्रकिया 31 डिसेंबर 20 अखेर पूर्ण करावी. या इमारतीसाठी आवश्यक असलेली कामे तत्काळ करून रुग्णांसाठी सर्व सोयींयुक्त असे सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल असावे. यासाठी इमारतीतील वॉटरप्रुफिंग, वॉटरप्रुफिंग बाँड, स्वतंत्र पाण्याची व्यवस्था, विजेच्या आवश्यक असणाऱ्या तारा आदी सुविधांचा आढावा घेत त्या उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे श्री. चव्हाण अधिकाऱ्यांना म्हणाले. त्याचबरोबर घाटी प्रशासनाचे मुलींसाठी असलेल्या वसतिगृहास मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात यावा. घाटी परिसरातील अतिक्रमण काढावे, अशा सूचनाही संबंध‍ित अधिकाऱ्यांना श्री. चव्हाण यांनी दिल्या.

सुरूवाातीला डॉ. येळीकर यांनी घाटीतील सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल आणि इतर अनुषंगिक करावयाच्या बाबींबाबत जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांना माहिती दिली.