कोव्हीड 19 लसीकरणाचा तालुकानिहाय सुक्ष्म आराखडा तयार करा – अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे

जालना, दि. 28 : कोव्हीड 19 मुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असुन कोव्हीडवरील लस लवकरच उपलब्ध होणार आहे. ही लस प्रत्येक व्यक्तीपर्यंत सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी लसीकरणाचे तालुकानिहाय सुक्ष्म नियोजन करण्याच्या सुचना अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी दिल्या.

कोव्हीड 19 लसीकरणासाठी जिल्हा कृती दल समितीच्या बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना अपर जिल्हाधिकारी श्री. पिनाटे बोलत होते.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, डॉ. सोनखेडकर यांच्यासह उप विभागीय अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांसह सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Image may contain: one or more people, people sitting and indoor

अपर जिल्हाधिकारी श्री पिनाटे म्हणाले, कोव्हीड 19 वरील लस लवकरच उपलब्ध होणार असुन या लसीचे तालुकानिहाय सुक्ष्म नियोजन करण्यात यावे. पहिल्या टप्प्यामध्ये ही लस आरोग्य क्षेत्रातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना टोचण्यात येणार असुन पुढील टप्प्यांमध्ये जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीला ही लस टोचण्यात येणार असल्याने लसीकरणासाठी आवश्यक असलेली सर्व साधनसामग्री अद्यावत ठेवण्याबरोबरच आवश्यक असलेली जागा सुनिश्चित करण्यात यावी. लसीकरणाबाबत कुठल्याही अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका न राहता लस प्रत्येक घटकापर्यंत सुरक्षितरित्या पोहोचण्यासाठी सातत्याने तालुका तसेच जिल्हा स्तरावर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे. तसेच लसीसंदर्भात जनसामान्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची असुरक्षितता निर्माण होणार नाही, याची सर्वांनी दक्षता घेण्याचे निर्देशही अपर जिल्हाधिकारी श्री पिनाटे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी तालुकानिहाय करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेत प्रत्येक तालुक्याने लसीकरणाचा सुक्ष्म आराखडा, एएफआय किट, लसीकरणासाठीची जागा याबाबतची माहिती तातडीने सादर करण्याच्या सुचना करत उपस्थितांनी लसीकरणाच्या अनुषंगाने विचारलेल्या शंका व प्रश्नांचे निरसन केले.