आत्मनिर्भर भारताचे ध्येय साकारण्यासाठी देशाला टिळकांच्या कर्मयोगाची गरज – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई दि. 25:- लोकमान्य टिळकांनी त्यांच्या गीतारहस्य या ग्रंथात भगवद्‌गीतेचा अर्थ कर्मयोगानुसार सांगितला आहे. त्यांनी भगवद्‌गीतेवर केलेल्या भाषणांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या संपूर्ण पिढीला प्रेरित केले. आज कर्म करण्याची मोठी आवश्यकता आहे. यासाठी परिश्रम, त्याग करणे गरजेचे आहे.आत्मनिर्भर भारताचे धेय साकारण्यासाठी देशाला टिळकांच्या कर्मयोगाची गरज आहे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीच्या शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर स्मृती न्यास यांच्या वतीने मैसूर असोसिएशन सभागृह, माटुंगा येथे गीता जयंती कार्यक्रमाचे आयोजन   करण्यात आले होते. त्यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, भगवद्‌गीतेमध्ये भक्तियोग, संन्यास योग, कर्मयोग आणि ज्ञान योगाबद्दल सांगितले आहे. थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांना  भगवद्‌गीतेने प्रेरणा दिली. गीता ग्रंथ वाचत असताना प्रत्येक वेळी नवीन अनुभव येत असतो. गीतेने मनुष्यमात्राला यशस्वी, सुखी, शांत आणि तृप्त जीवनाचा शाश्वत मार्ग दाखविला आहे. गीता जगाकडे व जीवन मार्गाकडे पाहण्याची मूलभूत अध्यात्मपर दृष्टी देणारा ग्रंथ आहे. आजच्या कलयुगामध्ये कर्मयोगाची नितांत गरज आहे.

दिनकर स्मृती न्यास संस्थेचे कार्य अतिशय चांगले आहे. यापुढेही या संस्थेने आपले कार्य निरंतरपणे चालू ठेवावे. या संस्थेच्या पुढील कार्यासाठी राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी 5 लाख रुपये देणगी दिल्याची घोषणा यावेळी केली .

कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन तसेच दीपप्रज्वलन करुन करण्यात आली.

यावेळी संस्थेच्या वतीने राज्यपाल श्री. कोश्यारी यांना भगवद्‌गीतेचा  हिंदी अनुवाद असलेला ग्रंथ  भेट म्हणून देण्यात आली. रामधारी सिंह दिनकर स्मृती न्यासचे  नीरज कुमार,वरिष्ठ रंगकर्मी मुजीब खान , मुंबई विद्यापीठाचे माजी हिंदी विभागप्रमुख रतन कुमार पाण्डेय,उच्च न्यायालयाचे अधिवक्ता आर पी सिंह ,चित्रपट निर्देशक पंकज नारायण, लोकमान्य टिळक स्वराज भूमी स्मारक समितीचे अध्यक्ष प्रकाश सिलम यावेळी उपस्थित होते.