गोवा मुक्ती संग्राम कित्येक वर्षांपासून दडपलेल्या आकांक्षेचा तो उद्रेकही होता-राष्ट्रपती कोविंद

राष्ट्रपतींच्या उपस्थितीत गोवा मुक्ती दिनानिमित्त पणजी येथे विशेष कार्यक्रम साजरा

गोवा, 19 डिसेंबर 2020

गोवा मुक्ती संग्राम केवळ गोव्याच्या नागरी स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष नव्हता; तर, पुन्हा भारताचा भाग बनण्याच्या गोवेकरांच्या कित्येक वर्षांपासून दडपलेल्या आकांक्षांचा तो उद्रेकही होता. या संग्रामादरम्यान फडकावण्यात आलेल्या तिरंग्यावरुन हेच प्रतीत होत होते. या राजकीय संघर्षासाठी महात्मा गांधींच्या शिकवणीचा वापरही भारतासोबत असलेल्या भावनिक ऐक्यभावनेचा प्रत्यय देणारेच होते, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. 60 व्या गोवा मुक्ती दिनानिमित्त पणजी येथे आयोजित विशेष कार्यक्रमात ते आज बोलत होते.

यावेळी बोलतांना राष्ट्रपती म्हणाले, आपल्या पूर्वजांनी स्वातंत्र्याची ज्योत कधीही विझू दिली नाही. ही ज्योत सतत तेवण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले आहे. आज या प्रसंगी मी त्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करत त्यांच्या बलिदानाबद्दल त्यांना आदरांजली अर्पण करतो.

जेंव्हा गोवा राज्य मुक्त झाले, त्यावेळी राज्यातील पायाभूत सुविधा आणि उद्योगक्षेत्र दोन्ही अविकसित होते. आज जेंव्हा गोवा आपल्या स्वातंत्र्याची साठ वर्षे पूर्ण करत आहे, तेंव्हा दरडोई उत्पन्नात हे राज्य देशात पहिल्या क्रमांकावर पोहचले आहे, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे, असे राष्ट्रपती म्हणाले.

याचे श्रेय, गोव्यातील मेहनती जनता, लोकप्रतिनिधी आणि प्रशासक तसेच उद्योग- व्यावसायिकांना जाते, असे राष्ट्रपती म्हणाले. आज जेंव्हा संपूर्ण देश आत्मनिर्भर भारताची उभारणी करण्यासाठी स्थानिक अर्थव्यवस्थेला मजबूत करण्याच्या दिशेने पुढे वाटचाल करतो आहे, अशा वेळी गोवा सरकारने सुरु केलेलं ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ अभियान कौतुकास्पद पाऊल आहे, असे राष्ट्रपती म्हणाले.

गोवा राज्याच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात उद्योग क्षेत्राचे योगदान देशात सर्वाधिक आहे. आकाराने छोटे असूनही या राज्यात मोठ्या उद्योग कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. गोवा राज्य उच्च दर्जाच्या औषधी आणि वैद्यकीय उत्पादनांसाठी ओळखले जाते. कोविड-19 विरोधातील लढ्यातही इथल्या औषध निर्माण कंपन्यांनी भारतात आणि परदेशातही महत्वाचे योगदान दिले, असे राष्ट्रपतींनी सांगितले.

गोव्याच्या संस्कृतीचे कौतुक करतांना राष्ट्रपती म्हणाले, इथल्या नागरिकांनी समान नागरी संहितेचा स्वीकार केला आहे, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. या निर्णयामुळे गोव्याच्या सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहनच मिळाले आहे. लोकशाही व्यवस्था आणि उत्तम प्रशासनाला मजबूत करत असतानाच गोव्यातल्या नागरिकांनी धार्मिक सलोखाही उत्तमरित्या जपला आहे, असे राष्ट्रपती म्हणाले. सक्रीय लोकसहभागाचे हे अद्वितीय उदाहरण गोव्याच्या नागरिकांच्या पुरोगामी विचारसारणीचे आदर्श उदाहरण आहे, असे राष्ट्रपती म्हणाले.