वैद्यकीय प्रवेश : ७०:३० चा कोटा रद्द करण्याच्या निर्णयाविरुध्द दाखल याचिका फेटाळल्या

औरंगाबाद, दिनांक 18 :वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत विभागवार विद्याथ्र्यांना प्राधान्य देणारा ७०:३०चा कोटा रद्द करण्याच्या शासनाने काढलेल्या शासन आदेशा विरोधात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद  खंडपीठाने शुक्रवारी फेटाळून लावल्या.
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २०१६ मध्ये तयार करण्यात आलेल्या विभागवार प्रवेश प्रक्रिया नियमात राज्य शासनाने एका परिपत्रकाद्वारे २०२० मध्ये दुरूस्ती केली होती. या दुरुस्तीस संपत बाबुराव गायकवाड, पराग शरद चौधरी आदींसह इतर विद्यार्थ्यांनी   औरंगाबाद  खंडपीठात आव्हान दिले होते.
विभागवार आरक्षणामुळे स्थानिक विद्याथ्र्यांना स्थानिक पातळीवर प्रवेश सुलभ होता. विभागातील महाविद्यालयात प्रवेश मिळवणे अधिक सोपे होते. परंतु, हा कोटा रद्द केल्यामुळे प्रवेशाच्या बाबतीत सरसकट सर्वांसोबत त्यांनाही रहावे लागणार आहे. यामुळे स्थानिक महाविद्यालयात प्रवेश मिळणे दुरापास्त होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या  हिताच्या दृष्टीने कोटा रद्द करण्याचा निर्णयच रद्द करण्याचे आदेश व्हावेत, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली होती.  
२ डिसेंबर रोजी या सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी न्या.संजय गंगापूरवाला व न्या.श्रीकांत कुलकर्णी यांच्या खंडपीठात झाली असता असा मुद्दा उपस्थित झाला होता की, कोटा रद्द करण्याच्या दृष्टीने २०१६ मध्ये संबंधित नियम बनविताना यासाठी विधानसभेची मान्यता घेण्यात आलेली होती का? न्यायालयाने याबाबत राज्य शासनाकडे विचारणाही केली होती. त्यावेळी राज्य शासनाचे विशेष वकील ज्येष्ठ विधिज्ञ अनिल अंतुरकर यांनी न्यायालयात तोंडी माहिती देताना स्पष्ट केले होते की, लॉकडाऊन असल्यामुळे विधानसभेचे अधिवेशन झाले नाही.  त्यामुळे वैद्यकीय विभागवार प्रवेश ७०:३० दुरूस्ती विधानसभेच्या पटलावर ठेवता आली नाही. आगामी अधिवेशनात यासंबंधीची दुरूस्ती विधानसभेच्या पटलावर ठेवू. त्यानंतर संबंधित दुरूस्ती रद्द अथवा मंजूर झाल्यास पुढील प्रक्रिया निश्चित करून ती राबविली जाईल. सुनावणीअंती न्यायालयाने याचिका फेटाळल्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्यांनी बाजू ज्येष्ठ विधिज्ज्ञ रमेश धोर्डे,  प्रशांत कातनेश्वरकर, शिवराज कडू, केतन पोटे, अरविंद आंबेटकर यांनी मांडली.  शासनाच्या वतीने जेष्ठ वकील अनिल अंतुरकर व सरकारी वकील  ज्ञानेश्वर काळे यांनी काम पाहिले.