फर्दापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक युवा पिढीसाठी प्रेरणादायक ठरेल – महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार

मुंबई, दि. 16 : औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगांव तालुक्यातील फर्दापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा मानस असून छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या वीर लढवय्याच्या कार्याची प्रेरणा युवा पिढीला मिळत रहावी यासाठी हे स्मारक महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. स्मारक उभारणीसंदर्भात चर्चा करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली.

बैठकीला माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, खासदार डॉ. अमोल कोल्हे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कार्यकारी सदस्य सचिन मुळे, सुप्रसिद्ध लेखक प्रा. नामदेवराव जाधव, शिरीष देशपांडे, इतिहास अभ्यासक प्रा.नितीन बाणगुडे पाटील,  दिग्दर्शक कार्तिक केंडे, शिल्पकार प्रमोद कांबळी, कॅलिग्राफर अच्युत पालव, आर. आर. पाटील फाऊंडेशनचे विनोद पाटील उपस्थित होते.

श्री. सत्तार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या वीर लढवय्याच्या कार्याची प्रेरणा युवा पिढीला मिळत रहावी यासाठी हे स्मारक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महाराजांचे युद्धकौशल्य, सुराज्य, अष्टप्रधान मंत्रीमंडळ, त्यांची हस्तलिखीते, शस्त्रास्त्रे असा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत करणारे पैलू एकाच ठिकाणी पर्यटकांना बघायला मिळणार आहे. हे स्मारक सर्व दृष्टीने परिपूर्ण असावे यासाठी इतिहास संशोधक, लेखक, वास्तुकला, शिल्पकार या सर्व तज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येणार असल्याचे श्री.सत्तार यांनी सांगितले.

टप्प्या-टप्प्याने तयार होणारे हे स्मारक दहा एकरच्या परिसरात उभारले जाणार असून पहिल्या टप्प्यात 21 कोटी रुपये एवढा निधी अपेक्षित आहे. या प्रकल्पाच्या भविष्यातील देखभाल दुरुस्तीसाठी खासगी संस्थांकडून सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत मिळणारा निधी वापरण्यात येईल. त्याचप्रमाणे स्थानिक आमदार आणि खासदार यांच्या निधीतील 10 टक्के निधी या कामासाठी राखून ठेवण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचे श्री. सत्तार यांनी यावेळी सांगितले.

उपस्थित मान्यवरांनी यावेळी विविध महत्त्वपूर्ण सूचना केल्या. या स्मारकाच्या ठिकाणी दृकश्राव्य माध्यमाचा जास्तीत जास्त वापर व्हावा, अशी सूचना माजी राज्यमंत्री श्री. खोतकर यांनी मांडली, शिवाजी महाराजांवरील साहित्याची अभ्यासिका असावी असे मत लेखक श्री. जाधव यांनी मांडले, मूर्तीकार श्री. कांबळे यांनी दगडी मूर्ती असावी असे सुचविले, प्रा. बानगुडे पाटील यांनी शिवाजी महाराजांच्या अचर्चित कार्यावरील शिल्पे उभारण्यावर भर द्यावा असे सांगितले, श्री. देशपांडे यांनी शिवाजी महाराजांवरील चित्रपट तयार करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले, खासदार डॉ.कोल्हे यांनी याच स्मारकाच्या धर्तीवर  त्यांचा मतदारसंघ जुन्नर येथे उभारण्यात येणाऱ्या ‘शिवसंस्कार सृष्टी’ या प्रकल्पाचे दृकश्राव्य सादरीकरण  यावेळी केले.

उपस्थित मान्यवरांना छत्रपती शिवाजी महाराजांचा छोटेखानी सिंहासनारुढ पुतळा महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यातर्फे भेट देण्यात आला.

असे असेल स्मारक

  • अजिंठा या जागतिक वारसा असलेल्या जगप्रसिद्ध लेण्यांच्या सभोवतालच्या फर्दापूर येथील परिसरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे दहा एकर जमिनीवर जागतिक दर्जाचे भव्य स्मारक
  • बालपण, मावळ्यांची माहिती, किल्ल्यांची माहिती, अष्टप्रधान मंडळ यांची माहिती देणारे दालन
  • स्मारक परिसरात महाराजांचा अश्वारुढ भव्य पुतळा
  • अद्ययावत ग्रंथालय, प्रशासनिक संदर्भाचे ग्रंथ, महाराजांची हस्तलिखिते, युद्धात वापरलेली शस्त्रास्त्रे यांचे प्रदर्शन
  • महाराजांच्या जीवनावर आधारीत चित्रपट दाखविण्यासाठी मुक्त आकाश रंगमंच (ॲम्फीथिएटर), 3डी ऑडीयो व्हिज्युअल, लेझर शो.