आधी महाराष्ट्रात विरोध करून दाखवा! – देवेंद्र फडणवीस

राज्य सरकारचा कृषी कायद्यांना बेगडी विरोध असल्याचा टोला

मुंबई: सध्या विधीमंडळात सुरु असणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विद्यमान सरकारवर ते कृषी कायद्यांना करत असलेला विरोध बेगडी असल्याचे म्हणत ताशेरे ओढले. आज विधीमंडळात सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.

 महाराष्ट्रात कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकार असताना जे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठी आणले गेले, त्याच कय्द्यची सुधारित आवृत्ती आता केंद्र सरकार जर संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांसाठी आणू इच्छित आहे, तर त्याला विरोध म्हणून अनेकजण थेट दिल्लीत गेले यावर फडणवीसांनी कडाडून टीका केली. तसेच हे कायदे जर तुम्हाला मान्य नसतील किंवा शेतकऱ्यांच्या हिताचे वाटत नसतील तर ‘आधी महाराष्टात विरोध करून दाखवा!’ असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडी सरकारला इशारा

राज्यात मराठा आरक्षणाच्य मुद्यावरून मराठा समाज आक्रमकपणे आंदोलन करत आहे. तर दुसरीकडे आत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणावर आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘ओबीसींच्या आरक्षणाल हात लावाल तर खबरदार, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला हात लावलेला चालणार नाही’ असा इशाराच फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.
 

 
ओबीसी समाजाच्या नेत्यांनी आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर मुंबईतील दादर इथं भाजपच्या कार्यालयात ओबीसी मंचाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर झालेल्या सभेत फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणावरून भाजपची भूमिका स्पष्ट केली.
 
‘भाजपसाठी ओबीसी मोर्चा महत्वाचा आहे, तो फक्त मतांसाठी महत्वाचा नाही. तळागतील व्यक्तींचा विकास होण्याकरता हा मोर्चा आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणात विकासाची आस या वंचित समाजाला आहे. योगेश टिळेकर यांनी ओबीसी समाजातील 346 घटकातील किमान 5 जण असले पाहिजे असा मेळावा घ्यावा. ओबीसी महाविकास मंडळांना एकही पैसा दिला जात नव्हता. पण आमच्या काळात 500 कोटी रुपये दिले होते. मात्र, महाविकास आघाडी सरकारने पुन्हा या महामंडळाचे काम थांबवले आहे. या सरकारने महाज्योतीला एकही पैसा दिला नाही’, असा आरोप फडणवीस यांनी केला.
 
तसंच, ‘आम्ही ओबीसींचं वेगळं मंत्रालय केलं होतं. ओबीसींकरता सध्या फक्त बोलबच्चनगिरी सुरू आहे. या सरकारमधील मंत्री, आमदार, ओबीसी आरक्षणाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. हे आम्ही सहन करणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाला हात लावला तर खबरदार, हे आम्ही मुळीच खपवून घेणार नाही’, असा इशाराच फडणवीस यांनी दिला.
या सरकारचे मंत्री मोर्चे काढत आहेत. त्यांनी तर राजीनामा दिला पाहिजे. लोकांना भटकवण्यापेक्षा मंत्रिमंडळात ठराव आणा की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. मंत्रिमंडळात गप्प बसायचं आणि बाहेर बोलायचं, हे कशाकरता? असा सवालही फडणवीस यांनी विचारला.
 
ओबीसी आरक्षणाला आम्ही धक्का लावू देणार नाही. त्यामुळे आता काँग‘ेस आणि राष्ट्रवादीने ओबीसी समाजाबद्दलची भूमिका काय ते सांगा, आमची भूमिका आहे की, ओबीसी आरक्षणाला हात लावलेला चालणार नाही, असा थेट सवालही फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे.
 
ओबीसी समाजात गोंधळ निर्माण केला जात आहे आणि विकास थांबवला जात आहे. एमपीएससीच्या परीक्षांचं काय होणार ते माहिती नाही. ओबीसींच्या विकासाचा आमचा संकल्प आहे. प्रत्येक वंचितापर्यंत विकास पोहोचवण्याचं आपलं काम आहे. येत्या काळात ओबीसी मोर्चाची भूमिका महत्त्वाची आहे, असंही फडणवीस म्हणाले.