उप निरीक्षकाच्या कारने चिरडले,पोलिस आयुक्तांनी चौकशी करावी

Mumbai Constable Viral Video : Constable Injures While Saving Man

औरंगाबाद, दिनांक 12 : दुचाकीवर जाणार्‍या आकेफा मेहरीन हिला भरधाव जाणार्‍या पोलिस उप निरीक्षकाच्या खासगी कारने चिरडल्याप्रकरणी दाखल फौजदारी याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. न्यायमुर्ती टी.व्ही. नलावडे आणि न्यायमुर्ती एम.जी. सेवलीकर यांच्या पीठाने गुन्ह्यात तपासी संस्थेने कोणतेही गांभिर्य न दाखविल्यामुळे औरंगाबाद पोलिस आयुक्तांनी स्वत: चौकशी करावी. गरज पडल्यास तपासी अधिकारी  बदलावा आणि आरोपीस पाठीशी घातल्याचे आढळल्यास संबंधीत तपासीक अधिकार्‍यावर कडक कारवाई करावी,  असे निर्देश दिले. याचिकेवर पुढील सुनावणी 5 जानेवारी 2021 रोजी होणार आहे.
11 वी विज्ञान शाखेत शिकणारी मयत आकेफा मेहरीन ही 22 एप्रिल 2019 रोजी दुचाकीवर (क्रमांक एमएच 20 सीई 9288) शासकीय कर्करोग हॉस्पीटलसमोरुन जात होती. त्यावेळी आकेफा हिच्या दुचाकीस पोलीस उप निरीक्षक संतोष पाटे यांच्या खासगी कारने  (क्रमांक एमएच 02 सीबी 2079) ने धडक दिली होती. गंभीर जखमी झालेल्या आकेफावर उपचार सुरु असताना 24 एप्रिल 2019 रोजी  पहाटे तिचा मृत्यू झाला. प्रकरणात सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यात योग्य चौकशी करून दोषींवर कारवाई करावी यासाठी मयत आकेफा यांचे वडील मोहम्मद जहीर (रा. आरेफ कॉलनी, मुळ रा. कळमनूरी, जि. हिंगोली) यांनी खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली.
सुनावणी दरम्यान याचिकाकार्त्याच्यावतीने प्रत्यक्षदर्शींचे शपथपत्र दाखल केले. तसेच गुन्ह्यात आरोपी पोलिस अधिकार्‍याला वाचविण्याचा प्रयत्न होत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारी पक्षाच्यावतीने तपासीक कादगपत्रे आणि इतर रेकार्ड सादर करण्यात आले. मात्र तपास अधिकार्‍याने अपघातग्रस्त कारचा जप्ती पंचनामा केला नाही. तसेच प्रादेशिक परिवहन विभागामार्फत कार तपासणी तब्बल 18 दिवस उशीराने केल्याचे देखील न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
त्यावर न्यायालयाने पोलिस खात्याशी संबंधित अधिकार्‍यावर गंभीर आरोप असताना तपासीक अधिकारीने अधिक काळजी घ्यायला हवी होती, त्याने खात्याशी संबंधित अधिकार्‍यास पाठीशी न घालता पोलिस खात्याची प्रतिमा मलिन होवू नये म्हणून अधिक गांभिर्य तपास आवश्यक होते. परंतु तपासीक संस्थेने कोणतेही गांभीर्य दाखविलेले नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवित वरील प्रमाणे निर्देश दिले.
प्रकरणात याचिकाकर्तेच्यावतीने सईद शेख यांनी बाजु मांडली. त्यांना सय्यद जाहीद अली आणि मुदस्सीर शेख यांनी सहकार्य केले. तर सरकार पक्षाच्यावतीने एस. जी. सलगरे यांनी काम पाहिले.