जमिनीच्या आरोग्यासाठी माती व पाणी परिक्षण महत्त्वाचे : कृषी मंत्री दादा भुसे

मालेगाव,दि. ५ : धरती मातेचे पूजन आज संपूर्ण जगात संपन्न होत असतानाच येणाऱ्या काळात या मातेच्या आरोग्य रक्षणासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे; जमिनीच्या आरोग्यासाठी माती व पाणी परिक्षण महत्त्वाचे असून पाणी व खताचा अतिवापर टाळून मातीचे आरोग्य जपावे लागणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी आज केले.

जागतिक मृदा दिनानिमित्त तालुक्यातील खडकी येथील सुळेश्वर महादेव मंदीराच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ, आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, प्रकल्प उपसंचालक हेमंत काळे, शास्त्रज्ञ रामदास पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, तंत्रअधिकारी गोकुळ अहिरे, पंचायत समिती कृषी अधिकारी किरण शिंदे, प्रमोद निकम, दीपक मालपुरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जागतिक मृदा दिनाच्या उपस्थित शेतकऱ्यांना शुभेच्छा देताना मंत्री श्री. भुसे म्हणाले, जमिनीच्या आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांना वितरित करण्यात आल्या आहेत, त्यावरून गावनिहाय जमिनीच्या सुपिकतेचा निर्देशांक दर्शविणारे फलक राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये दर्शनी भागावर लावण्यात येणार आहेत. त्यात नमूद केलेल्या प्रमाणात खतांची मात्रा देणे शेतकऱ्यांना सुलभ होणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. ज्या शेतकऱ्यांनी अजून माती, पाणी परिक्षण केलेले नाही त्यांच्यासाठी आदित्य कृषी सेवा केंद्र, चाळीसगाव फाटा, मालेगाव येथे मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. केंद्रशासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार यापुढे शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्याना केंद्रस्थानी ठेवून विविध कृषी योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याने शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांची व्याप्ती वाढविण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

पारंपरिक पध्दतीने करण्यात येणाऱ्या शेती व्यवसायापासून आपण लांब जात असल्याचे सांगतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, रासायनिक खताबरोबरच सेंद्रीय व जैवीक खताचा समतोल पध्दतीने वापर केल्यास जमिनीची पोत सुधारण्यास मदत होईल. येत्या दोन वर्षात शेतकऱ्यांचा किमान 25 टक्के खर्च कमी करून उत्पादन वाढीसाठी कृषी विभागामार्फत मोहिम राबविण्यात येत आहे, ही मोहिम नक्कीच यशस्वी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 75 ते 85 टक्के सबसिडीच्या कृषी विभागाच्या योजना लवकरच कार्यान्वित होतील. दोन लाखापेक्षा अधिक कर्जदार शेतकऱ्यांबाबतही कर्जमाफीचा लवकरच सकारात्मक निर्णय होईल असेही त्यांनी यावेळी नमूद केले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतील विकेल ते पिकेल हा सर्व प्रकल्पांचा एक छत्री कार्यक्रम शेतकऱ्यांना समृध्द करण्यात यशस्वी ठरेल असा विश्वासही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी व्यक्त केला.

मृदा दिनाच्या अनुषंगाने विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ, शास्त्रज्ञ रामदास पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तर तंत्रअधिकारी गोकुळ अहिरे यांनी सर्वांचे आभार मानले.