पदवीधर निवडणूकीत सतीश चव्हाण यांची रेकॉर्डब्रेक  विजयी हॅट्रीक

औरंगाबाद- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस ,शिवसेना व काँग्रेस  महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांनी 57895 मतांच्या फरकाने पहिल्याच फेरीत रेकॉर्डब्रेक  दणदणीत विजय मिळवत विजयाची हॅट्रीक केली.

            औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीचा निकाल आज सकाळी घोषित करण्यात आला. महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी पोस्टल मतांमध्ये घेतलेली आघाडी पहिल्या, दुसर्‍या, तिसर्‍या, चौथ्या व पाचव्या फेरीपर्यंत कायम राहिली. पोस्टलच्या झालेल्या एकूण 1073 मतांपैकी 29 मते अवैध ठरली तर सतीश चव्हाण यांना 600 मते मिळाली. पहिल्या फेरीत सतीश चव्हाण यांना 27250, दुसर्‍या फेरीत 26627, तिसर्‍या फेरीत 26739, चौथ्या फेरीत 26700, पाचव्या फेरीत 8722 अशी एकूण 116638 विक‘मी मते मिळाली. 1 डिसेंबर रोजी झालेल्या पदवीधर निवडणूकीत 241908 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी 218816 मते वैध तर 23092 मते अवैध ठरली. महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांतील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी समन्वय राखत सतीश चव्हाण यांनी उत्तम प्रचार यंत्रणा राबवली. तसेच या निवडणूकीत सतीश चव्हाण यांचा वैयक्तिक झंझावाती प्रचार, सुनियोजित निवडणूक यंत्रणा, पदवीधरांच्या प्रश्नांशी असणारा त्यांचा कनेक्ट, कार्यकर्त्यांची जबरदस्त फळी आदी या निवडणूकीत दिसून आली.

ही तर पदवीधरांनी दिलेल्या कामाची पावती

पदवीधर निवडणूकीत यावेळी वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीचा आधार घेत विरोधी पक्षाने आपलाच विजय होणार अशी हवा करण्याचा प्रयत्न केला. परंतु निकालांती त्यांचा फुगा फुटला.  सतीश चव्हाण यांनी बारा वर्षात काय केले? असा प्रश्न विचारणार्‍यांना पदवीधर मतदारांनी मतपेटीतून जोरदार प्रत्युत्तर दिले. महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांतील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पदवीधरांच्या भक्कम साथीने हा विक‘मी विजय मला प्राप्त करता आला. प्रत्येक ठिकाणी खांद्याला खांदा लावून लढलेल्या कार्यकर्त्याच्या ऐकीने ऐतिहासिक विजय प्राप्त होतो, हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. तसेच शैक्षणिक, राजकीय, सामाजिक यासह विविध संघटनांनी दिलेला जाहीर पाठींबा व अमूल्य साथ देखील तेवढीच महत्वाची होती. मराठवाड्यातील माझ्या तमाम सुज्ञ पदवीधर बंधू आणि भगिनींनी मला बारा वर्षांत केलेल्या कामाची पावती देत माझ्यावर पुन्हा एकदा जो अमीट विश्वास दाखवला आहे. त्यांच्या विश्वासाला मी कदापी तडा जाऊ देणार नाही. आ.सतीश चव्हाण