ग्लोबल टीचर पुरस्कारप्राप्त जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन

मुंबई, दि. 4 : युनेस्को आणि लंडन येथील वार्की फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर येथील जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले यांचे अभिनंदन केले आहे. पुरस्काराची बातमी समजल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी (दि.३) स्वत: त्यांना दूरध्वनी करून त्यांचे कौतुक केले.

यावेळी  रणजितसिंह डिसले यांनी ग्रामीण भागात शिक्षणाविषयी आवड निर्माण करण्यासाठी ते करीत असलेल्या उपक्रमांची मुख्यमंत्र्यांना माहिती दिली तसेच तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करतो ते सांगितले.

क्यूआर कोडच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्रांतीची दखल घेऊन 140 देशांतील 12 हजार शिक्षकांतून त्यांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. 7 कोटी रुपये अशी पुरस्काराची मिळालेली रक्कम इतर देशातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी तसेच टीचर इनोव्हेशन फंडसाठी आपण वापरणार असल्याचे त्यांनी सांगितल्यावर मुख्यमंत्र्यांनी शिक्षणासाठी दाखवलेल्या त्यांच्या समर्पणाची प्रशंसा केली. राज्यातील ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारणे व मुलांमध्ये शिक्षणाची आवड जोपासण्यासाठी निश्चितपणे त्यांचे मार्गदर्शन घेतले जाईल, असेही त्यांनी सांगितले.महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटतो आणि अशा उपक्रमशील शिक्षकांची राज्य तसेच देशाला खऱ्या अर्थाने गरज आहे, असेही मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलताना म्हणाले.

उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

सोलापूर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना युनेस्को व लंडनच्या वार्की फाउंडेशनतर्फे संयुक्तपणे दिला जाणारा ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. रणजितसिंह डिसले यांना जाहीर झालेला पुरस्कार ग्रामीण भागातील शिक्षकांचा गौरव वाढवणारा तसेच ग्रामीण भागातील शिक्षण चळवळीला बळ देणारा ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

रणजितसिंह डिसले यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला. उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांनी केलेले कार्य देशातीलच नव्हे तर, जगभरातील शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. ‘क्यूआर कोड’च्या माध्यमातून त्यांनी  घडवून आणलेल्या शैक्षणिक क्रांतीची दखल घेऊन १४० देशांतील १२ हजार शिक्षकांतून त्यांची या मानाच्या पुरस्कारासाठी झालेली निवड राज्याचा व देशाचा गौरव आहे.  पुरस्कार स्वरूपात मिळणारी ७ कोटी रुपयांची रक्कम इतर देशातील शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी तसेच  ‘टीचर इनोव्हेशन फंड’साठी वापरण्याचा त्यांचा निर्धार त्यांचे वेगळेपण सिद्ध करणारा आहे. भारताला गुरुशिष्य परंपरेचा गौरवशाली इतिहास आहे. रणजितसिंह डिसले यांनी ही परंपरा केवळ पुढे नेली नाही तर, या परंपरेचा गौरव वाढवण्याचं काम केलं आहे. त्यांना जाहीर झालेला ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ राज्यातील आणि देशातील शैक्षणिक चळवळीला नवीन  दिशा व गती देईल, असा मला विश्वास वाटतो. रणजितसिंह डिसले यांचे मनापासून अभिनंदन, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला आहे.

शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्याकडून अभिनंदन
ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्याबद्दल रणजितसिंह डिसले यांचे शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्याकडून अभिनंदन

युनेस्को आणि लंडनमधील वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी देण्यात येणारा सन 2020 चा ‘ग्लोबल टिचर’ पुरस्कार मिळाल्याबद्दल रणजितसिंह डिसले यांचे राज्य शासनाच्या वतीने शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी पत्र पाठवून हार्दिक अभिनंदन केले आहे.

प्रा. गायकवाड यांनी पत्रात म्हटले आहे की, या पुरस्कारासाठी जगभरातील 140 देशातून प्राप्त झालेल्या 12 हजार नामांकनांमधून आपली निवड झाली ही बाब अभिमानास्पद आहे. हा पुरस्कार मिळविणारे आपण पहिले भारतीय शिक्षक ठरले आहात. पुरस्काराबरोबर मिळालेल्या रू. सात कोटी रकमेतून अर्धी रक्कम आपण अंतिम फेरीतील विविध देशातील नऊ शिक्षकांमध्ये वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. यामधून आपली शिक्षणविषयक तळमळ व विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव न करता जगातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची आपली मानसिकता दिसून येते. यातून आपल्याकडील दुसऱ्याला देण्यामध्ये आनंद घेण्याची वृत्ती दिसून येते.

प्रत्येक मुलाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे हा त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. यामध्ये शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. तळागाळातल्या मागासवर्गीय मुलींच्या शिक्षणासाठी आपण अथक व विषेश प्रयत्न केल्यामुळे मुलींची शाळेतील गळती थांबली व बालविवाहांना आळा बसला.

क्यूआर कोडचा वापर करून पाठ्यपुस्तकातील कविता व पाठाबद्दल अधिकची माहिती मिळविता येते या आपल्या नाविन्यपूर्ण कल्पकतेला मायक्रोसॉफ्ट फाउंडेशनचा पुरस्कार मिळालेला आहे. आपणासारखे आपल्या कामावर निष्ठा असणारे, विद्यार्थ्यांविषयी तळमळ असणारे आणि तन मन धनाने शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी झटणारे शिक्षक असल्यामुळे महाराष्ट्रातील व देशातील विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.

भविष्यात शासकीय यंत्रणा, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था यांच्यामध्ये समन्वय वाढवून राज्यातील तसेच देशातील शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचविण्यासाठी आपण नेटाने प्रयत्न करूया.

“अंतिम यादीतील सगळ्या शिक्षकांकडे एकसारखीच गुणवत्ता आहे. मी फक्त निमित्त आहे. दुसरे म्हणजे अंतिम यादीतील नऊ शिक्षक जेव्हा वेगवेगळ्या देशांमध्ये मुलांच्या शिक्षणासाठी ही रक्कम खर्च करतील तेव्हा शिक्षण क्षेत्रात मोठा बदल घडेल.” हे आपले म्हणणे व कृती आपल्या देशाच्या महान परंपरेला साजेशी आहे. यामुळे देशाची व महाराष्ट्राची मान निश्चितच उंचावली आहे, असेही प्रा.गायकवाड यांनी अभिनंदन करताना म्हटले आहे.

यापुढेही आपण अशाच प्रकारे शिक्षण क्षेत्रामध्ये आपले नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वृद्धिंगत करावी, ही अपेक्षा व्यक्त करून रणजितसिंह डिसले यांच्या पुढील वाटचालीस प्रा.गायकवाड यांनी  मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.