विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करा, आ.सतीश चव्हाण यांची मागणी

औरंगाबाद- विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा देखील होणार नसल्याने विद्यापीठांनी विद्यार्थ्यांकडून घेतलेले परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत करावे अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज (दि.2) राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

 राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यांना सेमिस्टर परीक्षांच्या गुणांच्या आधारावर सरासरी गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र असे असताना देखील राज्यातील काही विद्यापीठात पदवी व पदव्युत्तरमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक वर्ष 2019-20 साठी ऑनलाईन पध्दतीने परीक्षा शुल्क आकारले जात असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. मुळात विद्यापीठाच्यावतीने विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणारे परीक्षा शुल्क हे प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका छापणे, परीक्षा केंद्रावर व्यवस्थापनासाठी होणारा खर्च, प्रश्नपत्रिकेसाठी वाहूतक व्यवस्था, उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करणे यासाठी केला जातो. मात्र शासनाने परीक्षाच रद्द करून सरासरी गुण देण्याचा निर्णय घेतला असताना मग विद्यापीठाच्यातवीने विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क का घेतले जात आहे? असा प्रश्न आ.सतीश चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

             ‘लॉकडाऊन’मुळे असंख्य विद्यार्थ्यांचे पालक आज आर्थिक अडचणीत सापडले आहेत. विशेषत: ग्रामीण भागातील पालकांना या ‘लॉकडाऊन’चा सार्वाधिक फटका बसला आहे. अनेक खाजगी संस्थेत काम करणार्‍या कर्मचार्‍यांना मागील दोन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारणे योग्य ठरणार नाही. उलट ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2019-20 च्या परीक्षांसाठी परीक्षा शुल्क भरले होते अशा सर्वच विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत करावे. जेणे करून ‘लॉकडाऊन’मध्ये सदरील पैशाचा विद्यार्थी व त्यांचा कुटुंबीयाना आर्थिक हातभार मिळेल. त्यामुळे यासंदर्भात त्वरीत योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.