मतदान केंद्राच्या ठिकाणचे आठवडी बाजार रद्द करण्याचे जिल्हाधिकारी मुगळीकर यांचे आदेश

परभणी, दि.30:- जिल्ह्यात औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीकरीता ज्या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदान होणार आहे, त्या ठिकाणचे आठवडी बाजार रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी दिले आहेत.

भारत निवडणूक आयोगाने दि. 2 नोव्हेंबर 2020 रोजी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक- 2020 निवडणुकीचा कार्यक्रम घोषीत केला असून कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. परभणी जिल्ह्यातील 5- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत , निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून आणि मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा. तसेच मतदान शांततेत पार पाडावे यासाठी ज्या ठिकाणी मतदान होणार आहे, त्या ठिकाणी आयोजित करण्यात येणारे आठवडी बाजार रद्द करणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन आदेश जारी केले आहेत.

हा आदेश निवडणूकीचे कामे हाताळतांना आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून दि. 30 नोव्हेंबर , 2020 रोजीचे मध्यरात्री 12 वाजे पासून ते दि.1 डिसेंबर , 2020 रोजी मतदानाची संपूर्ण प्रक्रिया होईपर्यंत अंमलात राहील. तसेच प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीसांनी जाहीर करुन त्यास प्रसिध्दी द्यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.