मिशन कोविड सुरक्षा या भारतीय कोविड -19 लस विकास अभियानासाठी 900 कोटी रुपयांचे तिसरे प्रोत्साहन पॅकेज केंद्र सरकारकडून जाहीर

नवी दिल्ली ,  29 नोव्हेंबर 2020

केंद्र सरकारने  मिशन कोविड सुरक्षा या भारतीय कोविड -19  लस विकास अभियानासाठी 900 कोटी  रुपयांचे तिसरे प्रोत्साहन  पॅकेज जाहीर केले आहे. भारतीय कोविड -19  लसींच्या संशोधन आणि विकासासाठी जैव तंत्रज्ञान विभागाला (डीबीटी)  हे अनुदान प्रदान केले जाईल.

वैद्यकीय विकास , उत्पादन आणि पुरवठा करण्यासाठी  नियामक सुविधा याद्वारे प्रारंभापासून लस वितरणावर केंद्रित असलेले हे कोविड 19 लस विकास अभियान  वेगवान उत्पादन विकासाच्या दिशेने सर्व उपलब्ध आणि अनुदानीत संसाधने एकत्रित करेल. यामुळे कोविड  संसर्ग रोखण्यासाठी अंदाजे 5-6 लसींच्या विकासाला गती देण्यास मदत मिळेल आणि परवाना तसेच सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत नियामक अधिकार्‍यांच्या विचारार्थ त्या बाजारात सादर करणे हे सुनिश्चित करण्यात  मदत होईल.

या निधीचे महत्त्वाचे उद्दिष्ट प्री-क्लिनिकल व क्लिनिकल विकासाला   गती देणे,  सध्या क्लिनिकल टप्प्यात असलेल्या  किंवा विकासाच्या क्लिनिकल टप्प्यात प्रवेश करण्यास तयार असलेल्या विविध कोविड -19  लसीचे परवाने , क्लिनिकल ट्रायल साइट्सची स्थापना करणे आणि विद्यमान इम्युनोसे प्रयोगशाळा, केंद्रीय प्रयोगशाळा आणि प्राणी अभ्यासासाठी योग्य सुविधा, उत्पादन सुविधा आणि इतर चाचणी सुविधा बळकट करणे हा आहे. सामायिक प्रोटोकॉल विकसित करण्यात सहाय्य,  प्रशिक्षण, डेटा व्यवस्थापन प्रणाली, नियामक सादरीकरण, अंतर्गत आणि बाह्य गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली आणि मान्यता ही  इतर महत्त्वाची उद्दीष्ट आहेत. योग्य लक्षित उत्पादनाचा विकास हा प्रमुख घटक असेल जेणेकरुन मिशनद्वारे सुरू केलेल्या लसींमध्ये भारतासाठी लागू असलेली  वैशिष्ट्ये प्राधान्यक्रमाने असतील.

कोविड सुरक्षा मिशनच्या पहिल्या टप्प्यात 12  महिन्यांच्या कालावधीसाठी 900  कोटी रुपये देण्यात आले आहेत.

जैव तंत्रज्ञान विभागाने आतापर्यंत शैक्षणिक आणि उद्योग या दोन्ही स्तरावर एकूण 10 लसींना  पाठिंबा दर्शविला आहे आणि आतापर्यंत 5 लसीची  मानवी चाचणी सुरू आहे  ज्यात रशियन लस स्पुतनिक -5 चा समावेश असून किमान 3 लसी  मानवी चाचण्यासाठी प्रगत अवस्थेत आहेत.

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव आणि बीआयआरएसीचे अध्यक्ष डॉ. रेणुस्वरूप  म्हणाले, “आपल्या देशासाठी स्वदेशी, परवडणारी व सहज उपलब्ध होणाऱ्या लसींचा विकास करण्यासाठी मिशन कोविड सुरक्षा आमचे लक्ष्यित प्रयत्न आहे आणि ते आत्मनिर्भर भारत या  राष्ट्रीय अभियानाला पूरक ठरू शकेल.”