अकरा लाखांचे  एलईडी टिव्ही लांबविणा-यास कोठडी

औरंगाबाद/प्रतिनिधी

जालना रोडवरील शोरुमचे शटर उचकटून अकरा लाखांच्या एलईडी टिव्ही लांबविणा-या प्रकरणी पोलिसांनी झारखंडमधील एकाला अटक केली. त्याच्याकडून १५ एलईडी टिव्ही जप्त करण्यात आल्या आहेत. मुस्तफा रबुल अन्सारी (२२, रा. खैरा टुंडा,गिरीडीह, झारखंड, ह.मु. भारतनगर, गारखेडा) असे आरोपीचे नाव असुन त्याला 6 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस. मांजरेकर यांनी मंगळवारी (दि. 2) दिले.

प्रकरणात लकजितसिंग केसरसिंग दुमडा (४८, रा. प्लॉट क्र. ५०, सिंधी कॉलनी) यांनी तक्रार दिली. तक्रारीनुसार, दुमडा यांचे जालना रोड, सेव्हनहिल येथील अपना कॉम्पलेक्समध्ये प्रतिक मार्केटींग व इलेक्ट्रॉनिक्स नावाचे दुकान आहे. दरम्यान देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून त्यांची दुकान बंद होती. बंद दरम्यान दररोज सकाळी ते आपल्या दुकानाकडे फेरफटका मारत होते. २८ मे रोजी सकाळी आठच्या सुमारास दुमडा हे नेहमीप्रमाणे दुकानाकडे फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना दुकानाचे शटर उचकटल्याचे दिसून आले होते. त्यामुळे त्यांनी आत जाऊन पाहणी केली. त्यावेळी सहा कंपनींच्या महागड्या किंमतीच्या २७ एलईडी टिव्ही चोरांनी लांबविल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. प्रकरणात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले होते. त्यात वापरण्यात आलेली दुचाकी (एमएच-२०-डीआर-५०१४) ही देवळाई परिसरातून चोरीला गेली होती. त्यावरून आणि रिक्षातून एलईडी टिव्ही चोरून पुंडलीकनगरातील एका बंद घरात ठेवण्यात आल्या होत्या.

पोलिसांनी एक जून रोजी छापा मारून टिव्ही आरोपी मुस्तफा अन्सारी याला अटक केली.  त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता गुन्ह्यातील उर्वरित 12 टिव्ही जप्त करणे आहे. आरोपीचे साथीदार शेख जाहेद शेख गणी (रा. भारत नगर, पुंडलिकनगर) व सोहेल सत्तार तांबोळी हे दोघे गुन्हा घडल्यापासुन पसार असुन त्यांचा शोध घेवुन त्यांना अटक करणे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी न्यायालयाकडे केली. विनंती मान्य करुन न्यायालयाने वरील प्रमाणे आदेश दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *