अहमद पटेल यांच्या निधनाने काँग्रेसने आपला ‘चाणक्य’ गमावला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. २५ : ज्येष्ठ अनुभवी नेते अहमद पटेल यांच्या निधनाने काँग्रेसने ‘चाणक्य’ गमावला आहे. राज्यात महाविकास आघाडी स्थापन करण्यात अहमद पटेल यांचीदेखील मोठी भूमिका होती.

खासदार अहमद पटेल यांच्या निधनाने उत्तम संघटनात्मक कौशल्य असलेला नेता काळाच्या पडद्याआड – सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण

अहमद पटेल हे काँग्रेस पक्षाचे चाणक्य समजले जात. पक्षाला प्रत्येक प्रसंगात त्यांचा आधार होता. केवळ राजकीय आघाडीवरच ते सक्रिय होते असे नव्हे तर अनेक सामाजिक कार्यांशी त्यांचा जवळून संबंध होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताना अहमद पटेल यांच्या मार्गदर्शनाचा आणि अनुभवाचा आम्हाला खूप उपयोग झाला, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात.त्यांच्या निधनाने काँग्रेस तसेच महाविकास आघाडीने देखील आपला मार्गदर्शक गमावला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

उत्तम संघटनात्मक कौशल्य असलेला नेता काळाच्या पडद्याआड – अशोक चव्हाण

ज्‍येष्‍ठ नेते व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष खासदार अहमद पटेल यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. त्यांच्या निधनाने एक अभ्यासू, जाणकार आणि उत्तम संघटनात्मक कौशल्य असलेले समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे.

आपल्या शोकसंदेशात श्री. चव्हाण म्हणाले, खासदार अहमद पटेल हे राष्ट्रीय राजकारणातील अत्यंत प्रभावशाली नेते होते. एक मुत्सद्दी राजकारणी आणि पेचप्रसंगांमध्ये कौशल्याने तोडगा काढणारे नेते म्हणून ते परिचित होते. देशाच्या कानाकोपऱ्यातील राजकारण आणि काँग्रेसच्या संघटनेचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. आयुष्यभर त्यांनी काँग्रेस पक्षाची सेवा केली. मात्र कधीही वैयक्तिक महत्वाकांक्षा बाळगली नाही. नेहमी व्यापक पक्षहित डोळ्यासमोर ठेवून काम केले.

मागील अनेक वर्षांपासून मी खासदार अहमद पटेल यांच्याशी संपर्कात होतो. विविध कामानिमित्त त्यांच्या भेटीगाठी व विस्तृत चर्चा होत असत. आपल्या जबाबदारीविषयी त्यांची कटिबद्धता विलक्षण होती. साधेपणा, संयमी व मुद्देसूद संभाषण असे त्यांचे अनेक स्वभाव गुण प्रत्येकाच्या मनाला भावणारे होते. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांचे कार्य आणि त्यांचे व्यक्तिमत्व दीर्घकाळ प्रत्येकाच्या स्मरणात राहील. खा. अहमद पटेल यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असेही श्री. चव्हाण म्हणाले.

अनुभवी निष्ठावंत व समर्पित नेतृत्व गमावले –बाळासाहेब थोरात

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार अहमद पटेल यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून काँग्रेस पक्षाने समर्पित, अनुभवी, निष्ठावंत, कुशल संघटक आणि रणनीतीकार नेते गमावले आहेत, अशा शब्दांत आपल्या शोकभावना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या आहेत.

खासदार अहमद पटेल यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्री. थोरात म्हणाले की, वयाच्या 26 व्या वर्षी अहमद पटेल यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. राजकीय पेचप्रसंगावेळी कौशल्याने तोडगा काढणारे उत्तम रणनीतीकार म्हणून त्यांची ओळख होती. ते तीन वेळा लोकसभा सदस्य व पाच वेळा राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून गेले. अनेकवेळा मंत्रिपदाची संधी असताना त्यांनी ती न स्वीकारता निरपेक्ष भावनेने पक्ष संघटनेत काम केले. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे संसदीय सचिव, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष अशा विविध पदांवर कार्यरत असताना त्यांनी काँग्रेस पक्ष संघटना मजबुतीसाठी मोठे योगदान दिले आहे.

कायम स्पष्ट राजकीय भूमिका घेण्यासाठी ते ओळखले जायचे. आपल्या भूमिकांशी ठाम राहणे, पक्षहित सर्वात प्रथम ठेवणे, देशभरातल्या नेत्यांशी सुसंवाद या त्यांच्या कामाच्या खास बाबी होत्या. काँग्रेससाठी अहमद पटेल हे कायम निरपेक्ष सैनिकाच्या रुपात सज्ज असायचे. महाराष्ट्रातही विद्यमान महाविकास आघाडीचे सरकार बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आणि मार्गदर्शन होते.

गेल्या अनेक वर्षापासून पक्षाच्या कामानिमित्ताने पटेल यांच्याशी गाठीभेटी व चर्चा होत असत. माझे त्यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनामुळे माझी कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. अहमद पटेल यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आपण खा. पटेल यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत असे मंत्री श्री. थोरात म्हणाले.

खासदार अहमद पटेल यांच्या निधनाने अनुभवी निष्ठावंत व समर्पित नेतृत्व गमावले –  महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
एका अभ्यासू, बुद्धिमान, परखड नेतृत्वास देश मुकला – मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या निधनाबद्दल मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “पटेलजी यांच्या निधनाने  पक्षासाठी एकनिष्ठ असलेला नेता गमावला असून  एक विद्वान राजकारणी आणि एका अभ्यासू, बुद्धिमान व परखड नेतृत्वास देश मुकला आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास सद्गती देवो”, अशा शब्दात मंत्री विजय वडेट्टीवार  यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

अहमद पटेल यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना श्री. वडेट्टीवार म्हणाले, अहमद पटेलजींच्या निधनाने देशाचे न भरुन येणार नुकसान झाले आहे. अहमद पटेल यांनी देशाची अविरतपणे आणि निस्वार्थी हेतूने सेवा केली आहे. त्यांनी समाजाची सेवा करत सार्वजनिक आयुष्यात अनेक वर्षे घालवली. कुशाग्र बुद्धिमत्ता आणि काँग्रेसला सक्षम करण्यातील त्यांची भूमिका यामुळे ते नेहमीच लक्षात राहतील. अहमदजी  हे विद्वान राजकारणी होते. मृदुभाषी, व्यवहार चतुर आणि नेहमी हसतमुख राहणे ही त्यांची वैशिष्ट्ये होती. अतिशय शांत, कुशाग्र आणि तीव्र राजकीय भान असलेले नेते होते. काँग्रेस पक्षासाठी त्यांनी केलेले काम अत्यंत प्रशंसनीय आहे. काँग्रेस पक्ष त्यांचे योगदान विसरू शकणार नाही.

काँग्रेसचे आधारवड अहमद पटेलजींच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन निघणार नाही असे वडेट्टीवार  म्हणाले. अहमदजी आज आपल्यात नसले तरी त्यांची वाणी, विचार नेहमीच प्रेरणा देत राहील, या शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली.