ह.भ.प.बद्रीनाथ तनपुरे यांना राज्य शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार

कार्तिकी एकादशीचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केली पुरस्काराची घोषणा

मुंबई, दि. 25 : राज्य शासनाच्या वतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा सन 2019-20 चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार ह.भ.प.बद्रीनाथ महाराज तनपुरे यांना बुधवारी मंत्रालय येथे घोषित करण्यात आला. कार्तिकी एकादशीचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी या पुरस्काराची घोषणा केली.

ह.भ.प.बद्रीनाथ तनपुरे यांना राज्य शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार

संत साहित्यावर उत्कृष्ट साहित्य लिहिणाऱ्या किंवा संतांना अभिप्रेत असलेल्या मानवतावादी कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीला राज्य शासनाच्या वतीने प्रतिवर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. रुपये 5 लक्ष, मानपत्र तसेच मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

ह.भ.प.बद्रीनाथ महाराज तनपुरे हे पंढरपुरातील तनपुरे महाराज आश्रमाचे विद्यमान अध्वर्यू असून वारकरी परंपरा आणि गाडगे महाराजांची परंपरा याचा समन्वय साधणारे संप्रदायातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जातात. पूज्य साने गुरुजींपासून ते डॉ. दाभोलकरांपर्यंत परिवर्तनाच्या चळवळीतील विविध घटकांशी त्यांचे साहचर्य राहिले आहे. वारकरी समाजासाठी तसेच समाजातील उपेक्षित वर्गांमधील घटकांसाठी मठातर्फे नानाविध कल्याणकारी उपक्रमांचे सतत आयोजन करण्यात येत असते. अखिल भारतीय मराठी संतसाहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, वारकरी साहित्य परिषद, महाराष्ट्र या संस्थेचे संस्थापक सदस्य व पदाधिकारी तसेच कीर्तनकार व प्रवचनकार म्हणून ते सर्वपरिचित आहेत.

यापूर्वी हा पुरस्कार श्री. रा. चिं. ढेरे, डॉ. दादा महाराज मनमाडकर, श्री.जगन्नाथ महाराज नाशिककर, श्री. रामकृष्ण महाराज लहवितकर, डॉ. यु. म. पठाण, प्रा. रामदास डांगे, फादर फ्रान्सिस दिब्रेटो, श्रीमती उषा देशमुख, ह.भ.प.निवृत्ती महाराज वक्ते, डॉ.किसन महाराज साखरे, श्री मधुकर जोशी यांना प्रदान करण्यात आला आहे.