मिलन मिठाईचे दुकान फोडणाऱ्या चोरट्यास अटक 

औरंगाबाद, दिनांक 25 :
सावरकर चौकातील मिलन मिठाईचे दुकान फोडुन दुकानातील 16 हजार 300 रोख व दान पेटीतील सहा हजार रुपये असा सुमारे 22 हजार 300 रुपयांची रक्‍कम चोरणार्‍या दोघा चोरट्यांना गुन्हेशाखेच्या पथकाने मंगळवारी रात्री अटक केली. पोलिसांनी त्यांच्या कडुन चोरीच्या ऐवजापैकी दोन हजार रुपयांची रोख रक्‍कम जप्‍त केली आहे.
मनोज मनोहर साबळे (21, रा. खंडोबा मंदीराजवळ सातारा) आणि सुनिल उर्फ मुन्‍ना नारायण वाकडे (23, रा. हायकोर्ट कॉलनी, सातरा परिसर) अशी आरोपींची नावे आहेत. दोघा आरोपींना शुक्रवारपर्यंत दि.27 पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी मंगला एम. मोटे यांनी बुधवारी दिले.
मिलन मिठाई दुकानाचे मालक राजाराम गोकुळराम बिष्णोई (29, रा. रेल्वे स्टेशन एमआयडीसी जवळ) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, 23 नोव्हेंबर रोजी बिष्णोई हे नेहमी प्रमाणे रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास दुकानबंद करुन घरी गेले होते. संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर तोडून दुकानातील वरील प्रमाणे ऐवज चोरुन नेला. 24 नोव्हेंबर रोजी पहाटे अडीज वाजेच्या सुमारास राजकमल राजपुरोहीत यांनी बिष्णोई यांना फोन करुन दुकानात चोरी झाल्याची माहिती दिली. त्यानंतर बिष्णोई यांनी दुकानाकडे धाव घेतली. या प्रकरणात क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान गुन्हे शाखेचे जमादार एस.एम. सोनवणे व त्यांचे सहकारी आयुक्‍तालयाच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना सातारा गावाजवळील नाल्याच्या बाजुला अंधारात सराईत चोरटा मनोज साबळे दिसला. त्याचवेळी सातारा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक वडणे हे सोनवणे व त्यांच्या पथकाला पाहून थांबले.  त्यानंतर पोलिसांनी अंधारात थांबलेल्या मनोज साबळे याला पकडले. त्याची चौकशी केली असता त्याने साथीदार मुन्न वाकडेच्या साथीने मिठाईच्या दुकानात चोरी केल्याची माहिती दिली.
दोघा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता आरोपींकडून चोरीची उर्वरित रक्‍कम जप्‍त करणे आहे. आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का याचा देखील तपास करणे बाकी असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकीलांनी न्यायालयाकडे केली.