निरपेक्ष, सकारात्मक वृत्तीने निवडणूक कामकाज पार पाडा – सुनील चव्हाण

सिल्लोड येथे निवडणूक अधिकारी, कर्मचारी यांचे दुसरे प्रशिक्षण

औरंगाबाद, दि.24 : औरंगाबाद मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक अधिकारी, कर्मचारी यांनी निरपेक्ष, सकारात्मक वृत्तीने निवडणूक कामकाज पार पाडावे. त्याचबरोबर कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत योग्य उपाययोजना कराव्यात, अशा सूचना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

सिल्लोड येथील शासकीय तंत्र निकेतन येथे सिल्लोड, सोयगाव तालुक्यातील मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांच्या दुसऱ्या निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमात श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, सिल्लोड तहसीलदार विक्रम राजपूत, सोयगाव तहसिलदार प्रवीण पांडे आदींची यावेळी उपस्थिती होती.

श्री. चव्हाण यांनी निवडणूक कामकाजात सहभागी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सकारात्मकरित्या निवडणूक प्रक्रियेला सामोरे जावे. तसेच सध्याच्या कोरोना आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन मास्क, फेसशिल्ड, हँडग्लोव्हज, सॅनिटायझर, सोशल डिस्टिंसिंगचा वापर करावा. स्वत: सह मतदारांची देखील काळजी घ्यावी. मतदार व निवडणुकीतील अधिकारी, कर्मचारी यांच्या आरोग्याची काळजी निवडणूक आयोगाकडून घेण्यात आली असून आयोगाच्या सूचनांचे पालन करावे. आयोगाने ठरवून दिलेल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात. प्रशिक्षणात सर्व माहिती सखोल व प्रात्यक्षिक दाखवून समजावून सांगण्यात येत आहे. तरी काही शंका असतील त्याचे तत्काळ निवारण करुन घ्यावे, असेही श्री. चव्हाण यावेळी म्हणाले. तसेच उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांच्या शंकांचे निरसनही श्री. चव्हाण यांनी केले.

सुरुवातीला श्री. चव्हाण यांनी शासकीय तंत्रनिकेतन येथे प्रशिक्षण दरम्यान केलेल्या सर्व सुविधांची पाहणी केली. त्यांचे स्वागत श्री. पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. तर प्रशिक्षणामध्ये श्री. पांडे यांनी मतपत्रिका, मतपत्रिकेची घडी, मतदान अधिकाऱ्यांचे कर्तव्ये, टपाली मतपत्रिका, मतपेटी हाताळणे, मतदान केंद्रावरील व्यवस्था आदींबाबत सचित्र व सविस्तर माहिती दिली.