सतीश चव्हाण यांनी आक्रमक पणे प्रश्न मांडून सरकारचे लक्ष वेधले-सत्तार

औरंगाबाद –: औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून सतीश चव्हाण यांनी मागील बारा वर्षांत उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यामुळे केलेल्या कामाच्या जोरावर त्यांची विजयी हॅट्रिक निश्चित असल्याचे राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. 

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज वाळूज येथील कै.दगडोजीराव देशमुख महाविद्यालय, औरंगाबाद शहरातील देवगिरी महाविद्यालय, एमजीएम कॅम्पस, नवखंडा महाविद्यालय, एमआयटी महाविद्यालय, फोस्टर डेव्हलपमेंट महाविद्यालय आदी ठिकाणी भेटी देऊन पदवीधर, प्राध्यापक, शिक्षकांशी संवाद साधला.

देवगिरी महाविद्यालयात आयोजित संवाद साधतांना अब्दुल सत्तार म्हणाले की, मराठवाड्यातील पदवीधरांच्या प्रश्नांबरोबरच शिक्षण, उद्योग, सिंचन, कृषी, क्रीडा आदी क्षेत्रातील प्रश्न देखील सतीश चव्हाण यांनी विधान परिषदेत आक्रमक पणे मांडून सरकारचे लक्ष वेधले. एक अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली असून अनेक प्रश्नांना त्यांनी न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून तिन्ही पक्षाची ताकद आपल्याला मतांमधून दाखवून द्यायची आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील काल सतीश चव्हाण यांच्या कामाची प्रशंसा करत त्यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले आहे त्यामुळे सतीश चव्हाण रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येतील असा विश्वास अब्दुल सत्तार यांनी व्यक्त करत त्यांच्या विजयी सत्कार समारंभास आपण याठिकाणी पुन्हा येणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले. 

माजी महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले की, सतीश चव्हाण एक कर्तृत्ववान उमेदवार असून औरंगाबाद शहर विकासासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. औरंगाबाद शहरातील विविध महत्वाचे प्रश्न त्यांनी सभागृहात मांडून ते प्रामाणीक पणे सोडवले. त्यामुळे प्रामाणिक काम करणाऱ्या सतीश चव्हाण यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना निवडून द्या असे आवाहन नंदकुमार घोडेले यांनी केले. यावेळी शेख सलीम शेख अहमद, डॉ.अविनाश येळीकर, त्रिंबकराव पाथरीकर, रामूकाका शेळके, डॉ.प्रकाश भांडवलदार, अभिजीत देशमुख, नितीन बागवे आदींची उपस्थिती होती.