देशात सर्वाधिक ‘आयुष्मान भारत केंद्र’ महाराष्ट्रात

नवी दिल्ली 20, : सार्वजनिक आरोग्य सेवांचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचावा यासाठी आयुष्मान भारत या योजनेची सुरूवात केंद्र शासनाने 2018 मध्ये केली. यातंर्गत देशभरात 50 हजाराहून अधिक आयुष्मान भारत आरोग्य व कल्याण केंद्र (एचडब्ल्यूसी) कार्यरत आहेत. यामध्ये सर्वाधिक 6381 केंद्र महाराष्ट्रात आहेत.

महाराष्ट्रात असणारी 6381 आरोग्य व कल्याण केंद्रांमध्ये 4117 सहायक आरोग्य केंद्र आहेत. ही दुर्गम  तसेच ग्रामीणपातळीवर कार्यरत आहेत. 1825 प्राथमिक आरोग्य केंद्रे असून ही निमशहरी भागात कार्यरत आहेत. 439 शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत, जी महानगरपालिका असणाऱ्या भागात कार्यरत आहेत. ही आरोग्य केंद्रे आरोग्य विभागाचा कणा असून या केंद्राच्या माध्यमातून राज्यात नियमित प्राथमिक आरोग्य सेवा प्रदान केली जाते.

आरोग्य आणि कल्याण केंद्राच्या माध्यमातून लोकांना सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रदान केली जाते. याअंतर्गत माता, नवजात अर्भके, पौगंडावस्थेतील पोषण, संसर्गजन्य रोगांचे नियंत्रण यासाठी ही केंद्र कार्यरत आहेत. यासोबतच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ई-संजीवनी प्लॅटफॉर्मच्या अंमलबजावणीचेही एचडब्ल्यूसी काम पाहते. यामध्ये रूग्ण-ते-डॉक्टर, ओपीडीची सेवा, डॉक्टर-ते डॉक्टर टेलिकन्सलटेशनची सेवाही पुरविण्यात येते.

कोविड-19 च्या महासाथीच्या काळात एचडब्ल्यूसीने महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे. गावपातळीपर्यंतचे आरोग्य विभागाचे नियोजन, देखरेख, प्रक्रियेची साखळी यामध्ये केंद्र शासन, राज्य शासन आणि केंद्रशासित प्रदेशांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हे शक्य होऊ शकले, असे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी अभिनंदन करतांना व्यक्त केले. या महासाथीच्या परिस्थितीत लाखो लोकांना आवश्यक सेवा दिल्याबद्दल आघाडीचे आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी आणि आशा सेविकांचे विशेष आभार केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी मानले. कोविडच्या परिस्थितीत त्यांचे योगदान अनुकरणीय असल्याचेही त्यांनी नमूद केले.

एचडब्ल्यूसीच्या माध्यमातून संपर्क ट्रेसिंग, समुदायाचे निरीक्षण करणे, रूग्णांची लवकर ओळख पटवणे या सारख्या बाबींमध्ये मदत झाली आहे. यासह नवजात बालके, वृद्ध आणि इतर आजार असणाऱ्या गटांच्या संरक्षणासाठी, आवश्यक त्या आरोग्य सेवा या काळात या केंद्रामार्फत प्रदान करण्यात आल्या आहेत.