पदवीधर मतदार संघ निवडणुकीत आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

नोडल अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा घेतला आढावा

औरंगाबाद, दि.20 : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 च्या अनुषंगाने नोडल अधिकारी यांनी निवडणुकीत आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी योग्य कार्यवाही पार पाडण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नोडल अधिकारी यांची आढावा बैठक श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. तत्पूर्वी पोलिस बंदोबस्त नियोजनाबाबतही त्यांनी सविस्तर आढावा घेतला. यावेळी पोलिस आयुक्त निखील गुप्ता, जिल्हा पोलिस अधीक्षक(ग्रामीण) मोक्षदा पाटील, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.भारत कदम आदींसह सर्व नोडल अधिकारी यांची उपस्थिती होती.

श्री. चव्हाण यांनी निवडणूक काळात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात यावा, तसेच यासंबंधी करावयाच्या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयास अवगत करावे. जेणेकरुन पुढील कार्यवाही वेळेत करणे सोयीचे होईल, असे पोलीस विभागास सांगितले. तर श्री. गुप्ता आणि श्रीमती पाटील यांनी जिल्ह्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला असून पुरेशा प्रमाणात मनुष्य बळही उपलब्ध असल्याचे यावेळी सांगितले. तसेच आचार संहितेत अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षण , कायदा व सुव्यवस्था सुरक्षा व जिल्हा सुरक्षा नियोजन, मतदान कर्मचारी, व्यवस्थापन, उमेदवार राजकीय पक्ष यांचे निवडणूक संबंधित खर्च व त्यावर नियंत्रण , मिडिया कक्ष, जंबो बॅलेट बॉक्स, मतपत्रिका छपाई व वितरीत टपाली मतपत्रिका, निवडणूक साहित्य मागणी, वितरण, वाहन व्यवस्था, संगणक कक्ष, स्वीप कार्यक्रम ,मतदारांना सुविधा स्ट्रॉंग रुम, मतमोजणी केंद्रांवर सुरक्षा, तयारी, मतदार यादी वितरण, कोविड-19 अनुषंगाने मतदान केंद्रांवर आरोग्य सुविधा, भोजनव्यवस्था मतदान आकडेवारी संकलन, वेबकास्टिंग यासंबंधित कक्ष प्रमुखांनी वेळेत, चोख कार्यवाही पार पाडण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच श्री. गव्हाणे यांनीही निवडणूक सुरळीत , पारदर्शक स्वरुपात पार पाडण्यासाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत यावेळी सर्व नोडल अधिकारी यांना मार्गदर्शन केले.