खते, बियाणे, औषधे परवाना नुतनीकरणाच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आठवडाभरात करण्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई, दि. 12 : खते, बियाणे, औषधे यांचे परवाना नुतनीकरण व नवीन परवाने प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आठवडाभरात करावा. त्यासाठी कालबद्ध नियोजन करण्याच्या सूचना कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी  दिल्या आहेत.

कृषी विभागातील विषयनिहाय आढावा बैठक नुकतीच कृषीमंत्र्यांच्या दालनात घेण्यात आली. यावेळी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरजकुमार यांच्यासह राज्यातील संचालक, सर्व विभागीय कृषी सहसंचालक उपस्थित होते.

या बैठकीत ‘विकेल ते पिकेल’ अभियान, कृषी पायाभूत सुविधा निधी योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आणि 10 हजार  शेतकरी उत्पादक कंपन्याची स्थापना करणे याबाबतचा आढावा घेण्यात आला. राज्यात मोठ्या प्रमाणात अन्न प्रक्रिया उद्योग सुरू असून त्यांचा तपशील विभागाकडे असणे आवश्यक आहे. त्याबाबत सर्वेक्षण करून माहिती एकत्रित करण्याचे निर्देश कृषीमंत्र्यांनी यावेळी दिले.

शेतकरी ते थेट ग्राहक भाजीपाला विक्री स्टॉलच्या उभारणीसाठी शेतकऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. तथापि इच्छुक शेतकऱ्यांमध्ये जाणीव जागृती, प्रशिक्षण, मालाचा दर्जा, त्याची रास्त किंमत, मालाची योग्य मांडणी यासारख्या बाबी देखील अधोरेखीत करणे गरजेचे असल्याचे श्री.भुसे यांनी सांगितले.

राज्यात नवीन शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याबरोबरच या अगोदर स्थापन झालेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना तांत्रिक आधाराची गरज आहे. शेतकरी उत्पादक कंपनीशी निगडीत असलेल्या विविध योजना नवीन असल्याने सर्व क्षेत्रिय अधिकारी व कर्मचारी यांचे एकत्रित प्रशिक्षण घेण्यात यावे. त्याचबरोबर कृषि विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांचे शासन निर्णय, मार्गदर्शक सूचना शेवटच्या घटकापर्यंत व लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी  विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देशही कृषीमंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिले.