मृत्यूचा खेळ आता चालणार नाही… : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ममता दीदींना निर्वाणीचा ‘संदेश’

Image

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हत्यांचे सत्र चालवून आपले मनसुबे पूर्ण करण्याचा विचार देशातील काही भागात सुरू आहे. त्यांना मी नव्हे तर जनताच इशारा देईन. निवडणूका होत असतात, जय – परायजय सुरूच असतो; मात्र हा मृत्यूचा खेळ आता चालणार नाही, असा निर्वाणीचा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नाव न घेता बुधवारी, दि. ११ नोव्हेंबर रोजी दिला. यामुळे आता बंगालमध्ये सत्तापरिवर्तन करण्याच्या भाजपाच्या मोहिमेस प्रारंभ झाला आहे.


बिहार विधानसभा आणि अन्य राज्यांतील पोटनिवडणुकीत भाजपा – एनडीएला मिळालेला विजय भाजपाच्या केंद्रीय कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांच्या साक्षीने बुधवारी सायंकाळी साजरा करण्यात आला. त्यावेळी पंतप्रधान मोदी बोलत होते, यावेळी देशाचे गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, दळणवळण मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष उपस्थित होते.

लोकशाही पद्धतीने भाजपाचा सामना करणे अथवा आव्हान देणे अनेकांना सध्या शक्य होत नाही, त्यामुळे देशाच्या काही भागात त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या हत्या करण्याचे सत्र चालविले आहे. त्यांना वाटते की भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्या करून त्यांचे मनसुबे साध्य करता येतील. त्या सर्वांना मी अतिशय आग्रहपूर्वक समजविण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांना इशारा देण्याची मला गरज वाटत नाही, कारण ते काम जनताच करणार आहे.
निवडणुकीत जय – परायजय होतच असतो, मात्र हा मृत्यूचा खेळ आता चालणार नाही आणि तो खेळ खेळून कोणालाही यश मिळणार नाही. आमचे इरादे अतिशय मजबूत असून कोणीही त्यावर संशय घेऊ शकत नाही, असा निर्वाणीचा संदेश पंतप्रधान मोदी यांनी ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेस सरकारचे नाव घेता दिला.
देशात काश्मीर ते कन्याकुमारी असे सर्वदूर कौटुंबिक आणि कुटूंबांच्या पक्षांचे जाळे पसरल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, हे जाळे लोकशाहीसाठी आणि देशाच्या इतिहासासाठी अतिशय धोकायदायक आहे. देशात एकेकाळी दीर्घकाळ सत्तेत असलेला पक्षदेखील कुटुंबांच्या जाळ्यात अडकल्याने त्यांची वाताहत झाली आहे. मात्र, देशातील तरुण वर्गाला या धोक्याची चांगलीच जाणीव आहे आणि त्यामुळेच भाजपाची जबाबदारी अधिकच वाढली आहे.
पक्षातील लोकशाही जीवंत ठेवणे हे आपले कर्तव्य!
भाजपामध्ये पक्षांतर्गत लोकशाही अतिशय मजबूत ठेवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आजवर ती मजबूत असल्यानेच एक पंतप्रधान नड्डाजी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं अशी घोषणा आपल्या पक्षाध्यक्षांसाठी देऊ शकतो. राष्ट्रहितास सर्वोच्च प्राधान्य देणार्‍या देशातील तरुण वर्गाला मी भाजपाद्वारे देशसेवा करण्याचे आमंत्रण देत असल्याचेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

Image


माता-भगिनींचा भाजपवर विश्वास!
 बिहारच्या निकालानंतर ‘सायलेंट व्होटर’ हा शब्द सातत्याने ऐकू येत आहे, भाजपाला अशा सायलेंट व्होटर्सचा लाभ झाल्याचेही सांगितले जात आहे. भाजपाचा हा ‘सायलेंट व्होटर’ म्हणजे देशातील नारीशक्ती आहे, देशातील माता आणि भगिनींचा भाजपाप्रती असलेला विश्वास ही आमची ताकद आहे. महिलांना सन्मान आणि सुरक्षा देणे हा भाजपाचे लक्ष्य आहे आणि त्यांचे जीवनमान सुधारणे हे आमचे ध्येय आहे.

Image



नारीशक्तीचा विजय!
भाजपाप्रती विश्वास असल्यानेच प्रत्येक निवडणूक ही नारीशक्ती भाजपाचा विजय निश्चित करत असते. त्याचप्रमाणे बिहारचा विजय म्हणजे भारताच्या आकांक्षांचा विजय आहे. देशात होत असलेल्या आर्थिक, कृषी, शिक्षणविषयक सुधारणा, देशाचे संरक्षण आणि नव्या व्यवस्थांची बांधणी आणि गरिब, दलित, शोषित घटकांच्या विकासासाठी होत असलेले प्रयत्न, या सर्वांवर जनतेने आपल्या पसंतीची मोहोर बिहारमध्ये उमटविली असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरची जगतप्रकाश नड्डा यांची बिहार विधानसभा ही पहिलीच निवडणूक होती. त्यात भाजपाला मिळालेल्या यशाचे श्रेय पंतप्रधानांनी नड्डा यांना देत त्यांचे मुक्तकंठाने कौतुक केले. नड्डा यांच्या रणनितीमुळेच मोठे यश मिळाल्याचे सांगत पंतप्रधान मोदी यांनी नड्डाजी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं अशी घोषणाही दिली. त्याचप्रमाणे पहिल्याच निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या विजयामुळे नड्डा यांच्या चेहर्‍यावरही समाधान स्पष्ट दिसत होते