NDA ने मिळवलं स्पष्ट बहुमत; तेजस्वी यादव यांना अपयश

नवी दिल्लीः बिहारमध्ये एनडीएने ( भाजप-जेडीयू ) बहुमताचा ( bihar election result ) आकाडा गाठला आहे, असा दावा केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी केला आहे. तर एनडीएने पूर्ण बहुमत मिळवले आहे. आरजेडी आणि एनडीएमध्ये जागांची मोठी तफावत आहे. आता त्यात बदल होण्याची शक्यता कमी आहे. यामुळे जिंकलो तर ठीक नाही जिंकलो तर मतमोजणीत घोळाचा आरोप करायचा हा त्या त्यांचा अजेंडा आहे, असं प्रत्युत्तर भाजपच्या संजय जयस्वाल यांनी आरजेडीच्या आरोपांवर दिलंय.

विजयी उमेदवारांना पराभूत घोषित केलं असा आरोप राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी आता केला आहे. इतकंच नाही तर नितीश कुमार हे मतमोजणी प्रक्रियेवर दबाव टाकत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. हीच तक्रार घेऊन राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसचं एक शिष्ट मंडळ निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहचलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे मतमोजणीच्या प्रक्रियेवर दबाव टाकत आहेत असा आरोप या शिष्टमंडळाने केला आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरूच आहे. आत्तापर्यंत  205 जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये 105 जागांवर एनडीएने विजय मिळवला आहे. 103 पैकी 63 जागांवर भाजपा, 34 जागांवर जदयू तर इतर दोन मित्रपक्षांनी 4-4 जागांवर विजय मिळवला आहे. एनडीए 19 जागांवर आघाडीवर आहे. महाआघाडीने 94 जागांवर विजय मिळवला आहे. त्यापैकी 64 जागा राजदने 17 जागा काँग्रेसने तर 13 जागा डाव्यांनी जिंकल्या आहेत. महाआघाडी 17 जागांवर आघाडीवर आहे. एमआयएमने 5 जागांवर विजय मिळावला आहे. बसपा आणि लोजपाने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे. तर अपक्षांनी एका जागेवर विजय मिळवला आहे.  

बिहार निवडणूक निकालावर शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया

बिहार निवडणुकीचे अंतिम निकाल हाती येण्यासाठी रात्र होणार असून सध्याची आकडेवारी पाहता बिहारमध्ये भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्तेच्या दिशेने घोडदौड सुरु आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची चिन्हं असून राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी तेजस्वी यादव यांचं कौतुक केलं.

“मी जी संपूर्ण प्रचारमोहीम पाहिली त्यानुसार स्वत: पंतप्रधान यामध्ये खूप रस घेत होते. यामुळे एका बाजूला पंतप्रधान, नितीश कुमार यांच्यासारखे अनुभवी नेते आणि दुसऱ्या बाजूला अनुभव नसलेले पहिल्यांदाच निवडणूक लढणारे तेजस्वी यादव होते. यामुळे तेजस्वी यादव यांना जे यश मिळालं आहे ते खूप चांगलं आहे. यामुळे अनेक तरुणांमध्ये उमेद निर्माण होईल अशी मला आशा आहे,” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.