कोविड कालावधीत शिक्षण विभागाचे काम उत्तम – शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड

मुंबई, दि. 10 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी या काळात अनेक शिक्षक वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. अनेक शिक्षक पाड्यावर, वाड्या-वस्त्यांवर जाऊन विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. स्वाध्याय पुस्तिका स्वत: तयार करुन विद्यार्थ्यांना देत आहेत. आठवड्याला गृह भेट देणे, दैनंदिन फोनच्या माध्यमातून विद्यार्थी संवाद, लाऊडस्पीकरच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षण असे अनेक उपक्रम राबवित आहेत. अशा सर्व शिक्षकांचे कार्य मोलाचे असल्याचे गौरवोद्गार शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली काढले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जयमहाराष्ट्र या कार्यक्रमात प्रा. गायकवाड बोलत होत्या. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन प्रसारित झालेली ही मुलाखत ज्येष्ठ पत्रकार श्री.राजेंद्र हुंजे यांनी घेतली.

प्रा. गायकवाड यांनी शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची यावेळी माहिती दिली. त्या म्हणाल्या, खऱ्या अर्थाने शिक्षकांमुळेच या काळामध्ये शिक्षण सुरु राहिले आहे. तसेच अशा शिक्षकांना एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी SCERT मार्फत ऑनलाईन शिक्षक विकास मंच हा कार्यक्रम सुरु करण्यात आलेला आहे. यामध्ये प्रत्येक जिल्हानिहाय उत्तम काम करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे.

गुगल क्लासरुम

गुगल क्लासरुम या उपक्रमाबद्दल प्रा. गायकवाड यांनी सांगितले की, राज्यासाठी  गुगल मार्फत एवढा मोठा प्लॅटफॉर्म मोफत स्वरुपामध्ये उपलब्ध करुन देण्यात आला. त्यामुळे असा उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे देशातील नव्हे तर कदाचित विश्वातील पहिले राज्य ठरले आहे. यामुळे विद्यार्थ्यांची सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. तसेच विद्यार्थी मुल्यमापन करणे सोपे जात आहे. याकाळामध्ये देखील शिक्षक व विद्यार्थी परस्परसंवादी राहण्यास मदत झालेली आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण

शिक्षणमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला त्याचवेळी थिंक टँक गटाची स्थापना केलेली होती. असे सांगून त्या म्हणाल्या, यामध्ये राज्यातील अनके नामवंत शिक्षणतज्ज्ञ, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षक, मुख्याध्यापक व अधिकारी वर्ग यांचा समावेश आहे. याचबरोबर या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, यांनी या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समितीच्या सदस्या असलेल्या डॉ.वसुधा कामत यांच्यासमवेत याबाबतचे चर्चासत्राचे आयोजन केले होते. तसेच SCERT मार्फत चर्चासत्रांचे आयोजन करुन या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीचे कामकाज सुरु केले आहे. राज्यामध्ये याची अंमलबजावणी करत असताना साधकबाधक चर्चा करणे याचबरोबर पुढच्या पिढीला दिशा देणारे असे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कशाप्रकारे चांगल्या पद्धतीने अमलात येईल यादृष्टीने विविधांगी यामध्ये बदल करणे व स्थानिक पातळीवरील गरजांना सामावून घेता येईल याचा देखील विचार करण्यात येत आहे. याचबरोबर अभ्यासक्रमामध्ये व पाठ्यपुस्तकातील आवश्यक बदल यावर देखील विचारमंथन सुरु आहे. असेही त्यांनी सांगितले.

बालदिवस

देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता 1 ली ते 12 वी च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बालदिवस सप्ताह दि. 08 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत शासनाच्यावतीने साजरा करण्यात येत असल्याचे प्रा. गायकवाड यांनी सांगितले. राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता 1 ली ते 12 वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून केले आहे.