मुद्रक, प्रकाशकांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे तंतोतंत पालन करावे -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद, दिनांक 07 : निवडणूक पत्रके, भित्तीपत्रके मुद्रण आण‍ि प्रकाशनावर जिल्हाधिकारी कार्यालयाचे नियंत्रण राहणार असून सर्व मुद्रक, प्रकाशकांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे तंतोतंत पालन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातील मुद्रक व प्रकाशक यांना आज दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पदवीधर मतदार निवडणुकीच्या अनुषंगाने मुद्रक व प्रकाशन या बाबींच्या नियंत्रणाबाबत श्री.चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, नायब तहसीलदार उद्धव नाईक, प्रगती ऑफसेटचे डी.डी.गव्हाड पाटील, लक्ष्मी आणि प्रिंटर्सचे श्री.जोशी, लक्ष्मीपती बालाजीचे प्रदीप बगडीया, मनोज प्रिंटर्सचे एस. ए. काथार, सुपर स्क्रीनचे दिलीप वरे, सोहम प्रिंटर्सचे पूजा वरे, प्रिंट लाईनचे विष्णू पाटील, देवगिरी प्रिंटर्सचे अरूण कोकाटे, देवगिरी प्रिंटर्सचे प्रवीण अडके आदींची उपस्थिती होती.

पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक पत्रकांच्या किंवा भित्तीपत्रकांच्या दर्शनी भागावर ते छापणाऱ्या मुद्रकांची किंवा त्याच्या प्रकाशकांची नावे व पत्ते व प्रतींची संख्या प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. नाव व पत्ते नसतील असे कोणतेही पत्रक किंवा भित्तीपत्रक छापणार किंवा प्रस‍िद्ध करणार नाही किंवा छापण्याची किंवा प्रसिद्ध करून घेण्याची व्यवस्था करणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. शिवाय मुद्रकांनी जिल्हाधिकारी कार्यालयास निवडणुकीचे भित्तीपत्रके, पत्रके इत्यादींचे मुद्रण करण्यासंबंधात विहित नमुन्यात व वेळेत माहिती सादर करावी, अशाही सूचना श्री. चव्हाण यांनी केल्या. त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे पालन करत सर्वांनी या निवडणूक कामकाजात प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन श्री. गव्हाणे यांनी यावेळी मुद्रक, प्रकाशकांना केले.