तरुणावर प्राण घातक हल्ला,आईसह आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

औरंगाबाद.२ जून :
आईवरुन शिवीगाळ का केली ?असे जाब विचारणाऱ्या  तरुणावर प्राण घातक हल्ला करुन, भांडण सोडविण्यासाठी आलेल्या तरुणाच्या आईचा विनयभंग केल्याची घटना २९ एप्रिल रोजी घडली. या प्रकरणात आरोपी आईसह तिघा मुलांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.जे. पाटंगणकर यांनी सोमवारी फेटाळला. 
रितेश बबलू डुगलज, नितीन बबलू डुगलज, बिट्टू बबलू डुगलज व आई बालेश बबलू डुगलज अशी आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणात २१ वर्षीय तरुणाने तक्रारी दिली होती. २९ एप्रिल रेाजी सायंकाळी पीडित तरुण हा परिसरातील एका मंदीरासमोर उभा असताना तेथे आरोपी रितेश डुगलज आला व तो तरुणाला थट्टा मस्करीत आईवरुन शिवीगाळ करु लागला. त्यामुळे तरुण त्याला समजावुन सांगत होता. त्याचवेळी आरोपी रितेशचे भाऊ नितीन व बिट्टू तेथे आले. त्यांनी देखील तरुणाला शिवीगाळ सुरु केली.  भांडणाचा आवाज ऐकुन तरुणाची आई व लहान भाऊ  भांडण सोडविण्यासाठी आली असता रितेशने अश्लिल चाळे करुन  तरुणाच्या आईचा विनयभंग केला. तर त्याच्या लहान भाऊ  भांडण सोडविण्याचा प्रयत्न करित असताना आरोपींची आई  बालेश हिने हातामध्ये टोकदार गुप्ती आणुन मारुन  टाका याला म्हणत गुप्ती रितेशकडे दिली. त्यानंतर आरोपींनी तरुणाला गुप्तीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तर तरुणाचा भाऊ भांडण सोडविण्याचा प्रयत्न करत  असताना त्याला देखील आरोपींनी मारहाण केली.
दरम्यान गुन्ह्यात अटक होऊ  नये यासाठी चारही आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज सादर केला होता. अर्जावरील सुनावणीवेळी आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करणे आहे, आरोपींना जामीन दिल्यास ते पुन्हा अशा प्रकारचे गुन्हे करण्याची शक्यता आहे. तसेच ते साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने आरेापींना जामीन देण्यात येवु नये अशी विनंती सहाय्यक लोकाभियोक्ता राजू पहाडीयांनी न्यायालयाकडे केली.ही विनंती न्यायालयाने मान्य केली.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *