औरंगाबाद विभाग पदवीधर निवडणूक ,1 डिसेंबरला मतदान

3 डिसेंबर रोजी मतमोजणी, विभागात आचारसंहिता लागू

औरंगाबाद, दि. 2 – भारत निवडणूक आयोगाने 5-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर केला आहे. निवडणुकीसाठी मतदान हे मंगळवार दि. 1 डिसेंबर 2020 रोजी तर मतमोजणी गुरुवार, दि. 3 डिसेंबर 2020 रोजी होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून औरंगाबाद विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत श्री. केंद्रेकर यांनी निवडणुकीच्या कार्यक्रमाची माहिती दिली. निवडणूक कार्यक्रमानुसार दि. 5 नोव्हेंबर 2020 रोजी निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली जाणार आहे. दि. 12 नोव्हेंबर 2020 रोजी नामनिर्देंशन पत्र भरण्याची अंतिम तारीख राहील. दि. 13 नोव्हेंबर 2020 रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी केली जाईल. दि. 17 नोव्हेंबर 2020 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक असेल. दि. 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 5.00 या कालावधीत मतदान होईल. मतमोजणी ही दि. 3 डिसेंबर 2020 रोजी होईल. दि. 7 डिसेंबर 2020 रोजी निवडणुक प्रक्रीया संपेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व दक्षता घेतली जाणार आहे. मतदारांसह निवडणूक प्रक्रीयेतील सर्व कर्मचाऱ्यांना मास्क अनिवार्य राहणार असून मतदान केद्रांवर सुरक्षित अंतर राखणे, थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर, आरोग्य कर्मचाऱ्यांची उपलब्धता असणार आहे. प्रत्येक जिल्हयासाठी नोडल आरोग्य अधिकारी नियुक्त केला जाणार आहे. अशी माहिती श्री. केंद्रेकर यांनी दिली.

नोडल अधिकारी यांची यंत्रणा सज्ज

औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूक जाहीर झाली असून निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलात आणण्यासाठी सर्व नोडल अधिकारी यांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व नोडल अधिकारी यांची बैठक श्री.चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार आणि जिल्ह्यातील सर्व नोडल अधिकारी यांची उपस्थिती होती.बैठकीत नोडल अधिकारी यांनी आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या सर्व सूचना, अनुसरायची पद्धत, कोविड 19 च्या अनुषंगाने घ्यावयाची खबरदारी आदींबाबत श्री. चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. बैठकीत श्री. गव्हाणे यांनीही अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. बैठकीचे प्रास्ताविक डॉ. कदम यांनी केले.